सिंधुदुर्ग – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे व परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांच्या माध्यमातून जिल्ह्यासाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन उपकरणे प्राप्त झाली आहेत. या उपकरणांचे लोकार्पण खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते आज येथे करण्यात आले.
जिल्हा रुग्णालयात आयोजीत करण्यात आलेल्या लोकार्पण प्रसंगी आमदार वैभव नाईक, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, संजय पडते, अतूल रावराणे आदी मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री उदय सामंत यांच्या पाठपुराव्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयास आज 4 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन उपकरणे प्राप्त झाली आहेत. या एका उपकरणाचे 65 हजार इतके मुल्य आहे. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन उपकरणामुळे प्राथमिक स्टेजला असलेल्या रुग्णाला ऑक्सिजनची आवश्यता भासल्यास याचा उपयोग करता येवू शकतो. नैसर्गिक हवेचे शुध्दीकरण करुन ऑक्सिजन रुग्णास पुरविण्यास यांची मदत होते. यासाठी वेगळ्या ऑक्सिजन सिलेंडरची आवश्यता भासत नाही. त्यामुळे हे उपकरण फायदेशीर असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर यांनी यावेळी सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी प्रस्तावित असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेची पाहणीही यावेळी खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांनी केली. त्याबरोबरच जिल्हा रुग्णालयातील आयुष अंतर्गत सुरु असलेल्या कामांची आढावाही घेण्यात आला. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढु नये यासाठी आरोग्य यंत्रणेने अधिक जबाबदारीने काम करावे. अशा सूचना खासदार राऊत यांनी यावेळी केल्या.