एन. एम. सी. ची मान्यता मिळाल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा मार्ग मोकळा चालू शैक्षणिक वर्षांपासून १०० विद्यार्थ्यांच्या बॅचची प्रवेश प्रक्रिया होणार सुरु खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक यांची माहिती

0
158

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अत्यंत गरजेच्या असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला आज केंद्र शासनाच्या एन. एम. सी. (नॅशनल मेडिकल कमिशन) ची मान्यता मिळाली आहे. या वर्षीपासून हे महाविद्यालय ओरोस येथे सुरु होणार असून या महाविद्यालयामध्ये एम. बी. बी. एस. च्या १०० जागा असणार आहेत, अशी माहिती खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक यांनी दिली आहे.

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन व्हावे, अशी मागणी खासदार विनायक राऊत, माजी पालकमंत्री दीपक केसरकर आमदार वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे वर्षभरापूर्वी झालेल्या दौऱ्याच्या वेळी केली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी ही मागणी मान्य केली होती. त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक प्रस्ताव देण्यात आले. या महाविद्यालयाला तात्काळ कॅबिनेटमध्ये मान्यता देण्यात आली. हे महाविद्यालय ओरोस जिल्हा रुग्णालयाच्या २० एकर जागेमध्ये होणार आहे. जिल्हा रुग्णालयाची जागा याआधी वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. यासाठी ९६३ कोटिंची तरतूद बजेट मध्ये करण्यात आली आहे. जुलै महिन्यात एन. एम. सी. च्या कमिटीने ओरोस येथे आवश्यक बाबींची पाहणी केली होती. त्यावेळी काही त्रुटी काढल्या होत्या. त्या त्रुटींची पूर्तता करण्यात आली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खा. विनायक राऊत, ना. उदय सामंत, आ. वैभव नाईक, आ. दीपक केसरकर यांच्या पाठपुराव्यामुळे आता एन. एम. सी. ची मान्यता मिळाल्याने महाविद्यालयाचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच महाविद्यालयाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात चांगली आरोग्य सेवा उपलब्ध होईल, अशी माहिती खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here