सिंधुदुर्ग-कोरोना’च्यापार्श्वभूमीवर लॉकडाऊन’मुळे लग्नसराईचा हंगाम सरत चालल्यामुळे सावंतवाडी तालुक्यातील इंसुली भटाचे टेंब येथील युवक व सातार्डा येथील युवती यांचा लग्नसोहळा संचारबंदीचे नियमांचे पालन करत बांदा येथे एका कार्यालयात झाला. नवरा, नवरी, एक मित्र व भटजी असे चौघेच या सोहळय़ाला हजर होते. एवढेच नव्हे, तर लग्नाची वरात दुचाकीवरून नवऱ्याच्या मांडवात गेली. या सोहळय़ाची चर्चा सध्या जिल्हाभर सुरू आहे.
एप्रिल व मे हे लग्नसराईचे दिवस असतात. लग्न समारंभ म्हटले की वधु-वर पक्षातील कुटुंबाच्या वेगवेगळय़ा अपेक्षा असतात. लग्नात काहितरी वेगळेपण असावे, अशी वधू-वरांचीही इच्छा असते. मात्र, यंदा जगभरात `कोरोना’ व्हायरसने थैमान घातल्याने देशभर लॉकडाऊन सुरू आहे. या काळात गर्दीत लग्न सोहळे करणाऱ्यांवर राज्यात काहि ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक जिल्ह्यातील बहुतांश विवाह सोहळे स्थगित झाले आहेत. त्यामुळे यंदाचा हंगाम लग्नसराईविना जाणार, असे म्हटले जात आहे. इंसुली भटाचे टेंब येथील वर स्वप्नील नाईक व सातार्डा येथील वधू रसिक पेडणेकर यांचा विवाह सोहळा संचारबंदीच्या नियमांचे उल्लंघन न करता बांदा येथील एका मंगल कार्यालयात झाला. हा लग्नसोहळा काही दिवसांपूर्वी ठरला होता. मात्र, संचारबंदीमुळे लग्न पुढे ढकलले होते. मात्र, लॉकडाऊनचा कालावधी वाढत असल्याने वधू व वर पक्षाकडून हा लग्नसोहळा शनिवारी करण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार शनिवारी लग्नसोहळा झाला. सकाळी नवरा आपल्या दुचाकीवरून बांधा येथील मंगल कार्यालयात आला. यावेळी मंगल कार्यालयात त्याचा मित्र हेमंत वागळे व नवरी उपस्थित होते. भटजींसह चौघांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा 11.55 च्या मुहूर्तावर पार पडला. लग्न सोहळय़ात सॅनिटायझर व मास्कचाहि वापर करण्यात आला होता. सोशल डिस्टंन्सिंगही पाळण्यात आले. सोहळा आटोपल्यावर वरात दुचाकीवरूनच मांडवात पोहोचली. वधू-वरांना बाजारात लोकांनी दाद देत शुभेच्छाही दिल्या. तर काहींनी त्यांचे फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल केले. सध्या या लग्नाची गोष्ट सिंधुदुर्ग जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे.



