एक राखी जवानांसाठी, सैनिक भावासाठी खोपोलीच्या भगिनींनी पाठवल्या राख्या 

0
254
सहजसेवा फौंडेशन,खोपोली, लायन्स क्लब ऑफ खोपोलीचा अभिनव उपक्रम 
प्रतिनिधी / रायगड
देशरक्षणासाठी सदैव तत्पर असलेल्या भारतीय सैन्याप्रती प्रत्येकालाच अभिमान असतो. खोपोलीसह रायगड जिल्ह्यातील नागरिक आणि विद्यार्थ्यांमध्येही तो ओतप्रोत भरलेला आहे. याच भावनेतून खोपोली आणि लगतच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी तब्बल १२०० राखी आणि शुभेच्छा संदेश भारतीय सैन्यातील सैनिकांना पाठविण्यासाठी जमा केलेत. सैनिक आणि भारतीय नागरिक यांच्यातील अतूट बंधनाचे हे प्रतीक आता लष्करापर्यंत पोहोचवले जाणार आहे.
निमित्त होते, खोपोलीतील सामाजिक संस्थांनी घेतलेल्या उपक्रमाचे. येथे नेहमीच सामाजिक भावनेने काम करणाऱ्या सहजसेवा फौंडेशन,खोपोली आणि लायन्स क्लब ऑफ खोपोली या संस्थांतर्फे एक राखी जवानांसाठी ” हा एक अभिनव उपक्रम घेण्यात आला.  येत्या १५ ऑगस्ट २०१९ रोजी रक्षाबंधन आहे…!! तत्पूर्वी राख्यांचे संकलन करणे आणि त्या राख्या सैन्य दलातील अधिकाऱ्यांकडे पोच करणे असा या संस्थांचा मानस होता. दिवसरात्र राष्ट्राचे रक्षण करणाऱ्या जवानांसाठी आपल्या परिसरातील भगिनी आपली राखी सैनिकांना या उपक्रमाद्वारे पाठवू शकतात, तरी आपल्या संस्थेकडे राख्या जमा कराव्यात असे आवाहन या दोन्ही संस्थांच्या वतीने करण्यात आले होते. त्याप्रमाणे पेण जवळील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, वरवणे, जनता विद्यालय,खोपोली, सह्याद्री विद्यालय, शीळफाटा,शिशु मंदिर,खोपोली,कॉम्प्युटर पॉईंट,खोपोली यांच्याकडून राखी संकलन करण्यात आली. विशेष म्हणजे आपल्या सीमेचे रक्षण करणाऱ्या या सैन्य बंधूना पाठविण्यासाठी साधारण १२००  राख्या,संदेश पत्र शुभेच्छापत्र जमा करण्यात आलीत.शाळेच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळे संदेश पाठवून, तसेच पेण येथील शाळेने आदिवासी परंपरेला अनुसरून राख्या स्वतः तयार करून पाठविल्या.
जमा झालेल्या या  राख्या,संदेश पत्र शुभेच्छापत्र खोपोली नगर परिषदेने स्वच्छ भारत अभियानांतर्गत नागरिकांसाठी वाटलेल्या कापडी पिशव्यात भरून आज गुरुवार (दि. ८ ऑगष्ट) रोजी खोपोली नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सुमन औसरमल, मुख्याधिकारी गणेश शेटे,नगरसेवक मोहन औसरमल यांच्या हस्ते माजी सैनिक प्रकाश महाडिक यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या. प्रकाश महाडिक यांच्या माध्यमातून या राख्या भारतीय लष्करापर्यँत १५ ऑगष्ट पूर्वी पोचविल्या जाणार आहेत.
हा कार्यक्रम खोपोली नगर परिषद मध्ये पार पडला. या प्रसंगी लायन्स क्लब ऑफ खोपोलीचे अध्यक्ष सुजित पडवळकर, खजिनदार राकेश ओसवाल,सोमनाथ हेगडे,लायन लेडी ऑक्सिलरी खोपोलीच्या अध्यक्षा व प्रोजेक्ट चेअरमन पल्लवी पडवळकर,आशा देशमुख,लायन्स क्लब ऑफ खोपोलीचे डायरेक्टर व सहजसेवा फौंडेशन, खोपोलीचे अध्यक्ष शेखर जांभळे,खजिनदार संतोष गायकर, पूनम तेलवणे, निरंजन भोजागोल, जयश्री भागेकर, उपक्रम प्रमुख एलिझाबेथ वॉल्टर, हैबती जाधव, मोहन गोतपागर आधी उपस्थित होते.
खोपोली नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री गणेश शेटे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे, शाळेचे, सहभागी इतर घटकांचे मनःपूर्वक कौतुक केले आहे, समाजाला अश्या वैविध्यपूर्ण उपक्रमातून समाजाप्रती प्रेम व्यक्त करण्याची नितांत आवश्यकता आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
(सौजन्य : www.sahajshikshan.com)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here