ऍक्शन चांगली असेल तर रिऍक्शन चांगली असणार पण ऍक्शनच वाईट असेल तर रिऍक्शन हि वाईट होणार असे सूचक वक्तव्य पालकमंत्री उदय सामंत यांनी राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रे संदर्भात केले आहे. तसेच जिल्ह्यात मनाई आदेश लागू असल्याने या मनाई आदेशाचे उल्लंघन झाल्यास कोणती कारवाई करायची हे जिल्हाधिकारी ठरवतील. असेही त्यांनी सांगितले.
पालकमंत्री उदय सामंत यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज दुपारी आगमन झाले. कणकवली शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांनी आढावा घेतला.त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
ना.उदय सामंत पुढे म्हणाले, जन आशीर्वाद यात्रेला आमचा विरोध नाही पक्ष वाढविण्याचा सर्वांना अधिकार आहे.परंतु देशात गॅस, पेट्रोल, डिझेल व इतर सर्वच वस्तू महागल्या आहेत. ही महागाई कधी कमी करणार , जिल्ह्यात रोजगार निर्मितीसाठी काय करणार याबाबत जनआशीर्वाद यात्रेत बोलले पाहिजे.मात्र शिवसेनेवर, मुख्यमंत्र्यांवर टीका करण्यासाठीच ही यात्रा काढली जात असल्याचा अनुभव येत असल्याचे त्यांनी सांगितले.
अलीकडे झालेल्या सर्वेक्षणात मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे देशात लोकप्रिय मुख्यमंत्री असल्याचे समोर आले आहे. संपूर्ण देशात उद्धवजी ठाकरे यांना मानणारा वर्ग आहे.भविष्यात ते देशाचं नेतृत्व करू शकतात यामुळे काहींना पोटशूळ आला आहे.त्यातुनच मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्यावर टीका होत आहे असे ना. उदय सामंत यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा समन्वयक प्रदीप बोरकर, शिवसेना नेते संदेश पारकर, अतुल रावराणे,उपजिल्हाप्रमुख राजू शेटये, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, नगरसेवक सुशांत नाईक, कन्हैया पारकर, संदेश पटेल, हर्षद गावडे, मंगेश सावंत, सचिन सावंत,रामू विखाळे, राजू राठोड,शेखर राणे, रिमेश चव्हाण आदिंसह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.