सिंधुदुर्ग – खासदार विनायक राउत, पालकमंत्री उदय सामंत, आ.वैभव नाईक आ.दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी राज्यशासनाच्या माध्यमातून ६ नवीन रुग्णवाहिका देण्यात आल्या. त्यातील एक रुग्णवाहिका वरवडे प्राथमिक आरोग्य केंद्राला देण्यात आली. मात्र आमदार नितेश राणे हि रुग्णवाहिका आपणच मंजूर केल्याचे भासवून त्याचे श्रेय लाटत आहेत. दुसऱ्याने केलेल्या कामाचे श्रेय घेणे एवढेच काम आता नितेश राणेंकडे उरले आहे. मात्र जनता सर्वकाही ओळखते त्यामुळे आ. नितेश राणेंनी जनाची नाहीतर मनाची तरी लाज बाळगून हे धंदे बंद करावेत अशी खोचक टीका शिवसेना नेते संदेश पारकर यांनी केली आहे.
गेली ३० वर्षे नारायण राणे व गेली ६ वर्षे नितेश राणे कणकवली मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांचा मूळ गाव व मतदानही वरवडे गावातच आहे. मात्र इतकी वर्षे राजकारण करून मुख्यमंत्री पद भूषवून देखील राणेंना आपल्या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी साधी रुग्णवाहिका देता आली नाही. मात्र मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे मागणी केल्यानंतर त्यांनी तातडीने जिल्ह्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या.
जिल्हा परिषद सदस्या स्वरूपा विखाळे यांनी पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत यांच्याकडे वरवडे प्रा. आ. केंद्रासाठी रुग्णवाहिकेची मागणी करून त्यासाठी पाठपुरावा केला होता. सौ. विखाळे यांच्या मागणीनुसार पालकमंत्री उदय सामंत यांनी राज्य शासनाकडून आलेल्या रुग्णवाहिकांपैकी एक रुग्णवाहिका वरवडेसाठी उपलब्ध करून दिली आहे. मात्र नितेश राणे लोकांची दिशाभूल करण्यासाठीच वरवडे ला दिलेल्या रुग्णवाहिकेचे श्रेय लाटत आहेत. शिवसेनेने केलेल्या कार्याचे श्रेय घेऊन नितेश राणे आपली करपलेली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत.राणेंना जर रुग्णवाहिका द्यायची होती तर इतके वर्षे ते झोपले होते का? राणेनी याअगोदर रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली असती तर आज मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी राज्यशासनाच्या माध्यमातून मंजूर केलेल्या रुग्णवाहिकेचे श्रेय घेण्याची वेळ आली नसती असा पोलखोल शिवसेना नेते संदेश पारकर यांनी केला आहे.