सिंधुदुर्ग – दारुच्या नशेत गाडी चालवत जाताना दोन दुचाकी व एका कारला धडक देत रेंज रोव्हर चालक आंबोलीच्या दिशेने पळून गेला. मात्र, आंबोलीत फॉरेस्ट चौकीलगत एका पोलला धडक दिल्यानंतर आंबोली पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. करण विमलेश आहेर ( २६, मूळ गुजरातचा सध्या रा. गोवा ) असे त्याचे नाव आहे. मात्र, तो आंबोलीच्या दिशेने का जात होता याबाबत त्याने कोणतीही माहिती दिलेली नाही. आंबोली पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी त्याला आरोग्य उपकेंद्रात नेण्यात आले आहे. यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आंबोली दूरक्षेत्रावरील पोलीस लाठीवर स्वतः सावंतवाडी पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी हे दाखल झाले असून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.
संबंधित कार चालक कमलेश हा आपल्या ताब्यातील रेंज रोव्हर ही आलिशान कार घेऊन झाराप येथून सावंतवाडी मार्गे आंबोलीच्या दिशेने वेगाने जात होता. यावेळी त्याने सावंतवाडी येथे दोन दुचाकींना तर कारिवडे येथे एका कारला धडक दिली. याबाबतची माहिती स्थानिकांनी सावंतवाडी पोलिसांना दिली. दरम्यान आंबोली मार्गे कोल्हापूरच्या दिशेने पळून जात असताना महादेवगड तिठ्यावर असलेल्या चेकपोस्टलगत एका खांबाला त्याने जोरदार धडक दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. यावेळी दारूच्या नशेत असल्याने सदर कारचालक कोणतीही माहिती देण्यास तयार नव्हता. मात्र पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर तो गोवा येथील व मूळ गुजरात चा रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले. त्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे