सिंधुदुर्ग – कणकवली तालुक्यातील कनेडी येथे दोन गटात झालेल्या राजकीय राड्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. दरम्यान शिवसेना ठाकरे गट आणि भाजपा कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते.
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या फिर्यादीवरून आमदार वैभव नाईक यांच्यावर कणकवली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कणकवली पोलीस ॲक्शन मोडवर आले असून अत्यंत गुप्तपणे हालचाली सुरू आहेत.
कणकवली तालुक्यातील केनेडी बाजारपेठेत 24 जानेवारीला शिवसेना ठाकरे गट आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला होता. यावेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी हाणामारी केली होती. भाजपचे शेकडो कार्यकर्ते केनडी बाजारपेठेत दाखल झालेत. शिवसेनेने देखील कार्यकर्त्यांची या ठिकाणी जमवाजमा केली होती दोन्ही बाजूचे आक्रमक कार्यकर्ते एकमेकांच्या कार्यालयांवर चालून गेले होते.
या राड्याच्याबपार्श्वभूमीवर आमदार वैभव नाईक यांचा एक व्हिडिओ समोर आला. एक दांडा हातात घेऊन आमदार वैभव नाईक हे भाजपा कार्यकर्त्यांच्या दिशेने जात असल्याचे यामध्ये दिसून येत आहे. यावेळी अतिरिक्त पोलीस कुमक मागून हा राडा कणकवली पोलिसांनी शांत केला होता.
आंगणेवाडी यात्रेसाठी पोलीस होते शांत
आंगणेवाडी जत्रोत्सवाचा पोलीस बंदोबस्ताचा पोलीस प्रशासनावरील ताण कमी झाल्यानंतर आता कणकवली तालुक्यातील कनेडी राड्या मधील दोन्ही बाजूच्या काही संशयित आरोपींना अटकेच्या दृष्टीने कणकवली पोलिसांच्या हालचालींनी वेग घेतला आहे. त्या घटने वरून दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये भाजपा व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षाचे राजकीय नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते असल्याने कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने व पोलिसांकडून आंगणेवाडी यात्रा व भाजपाची आनंदोत्सव सभा या दोन्हीसाठी लागणारे पोलीस बळ या पार्श्वभूमीवर ही कारवाई थांबवण्यात आली होती असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. मात्र आता आंगणेवाडी यात्रोत्सव बंदोबस्ताचा ताण कमी झाल्यानंतर या राड्यातील संशयित आरोपींना ताब्यात घेण्याच्या दृष्टीने हालचालीनी वेग घेतला आहे. दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज रात्री उशिरा किंवा उद्या दिवसभरात सदर गुन्ह्यांमधील नावे नमूद असलेले दोन्ही पक्षांचे काही ठराविक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी स्वतःहून पोलिसात हजर राहण्याच्या सूचना पोलिसांकडून दिल्याचे समजते. त्यामुळे आज रात्रीपासून किंवा उद्यापासून हे संशयित पोलिसात हजर होतील. किंवा रात्री उशिरा संशयतांना ताब्यात घेतल्याची रेकॉर्डवर दाखवले जाईल. त्या दृष्टीने पोलिसांकडून हालचाली वेग घेऊ लागल्या आहेत. दरम्यान याबाबत कणकवली पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अद्याप अशा हालचाली सुरू नसल्याचे सांगितले.