सिंधुदुर्ग- आखाती देशांमधील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीमुळे कोकणातील हापूस आंबा बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. दरवर्षी भारतातून होणाऱ्या एकूण आंबा निर्यातीपैकी मोठा हिस्सा आखाती देशांमध्ये जातो. मात्र, हे युद्ध लांबल्यास हवाई आणि समुद्री वाहतुकीत अडथळे निर्माण होऊन आंबा निर्यात ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे बागायतदारांना मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागू शकतो.
उत्पादनात ४० टक्क्यांपर्यंत घट
यंदा केवळ युद्धच नव्हे, तर निसर्गाच्या लहरीपणाचाही मोठा फटका आंबा उत्पादनाला बसला आहे. ऑक्टोबर महिन्यात अपेक्षित उष्णता न मिळाल्याने आणि तुडतुड्यांचा प्रादुर्भाव वाढल्याने कोकणात हापूसच्या उत्पादनात ३० ते ४० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता आहे. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर आणि ठाणे या जिल्ह्यांत सुमारे १ लाख ते १.८२ लाख हेक्टर क्षेत्रावर आंब्याची लागवड असून, त्यातून वार्षिक ३,०८,४८० मेट्रिक टन उत्पादन घेतले जाते.
निर्यातीचे गणित आणि बाजारपेठ
मुंबईतील वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीमधून होणाऱ्या एकूण निर्यातीपैकी ३० टक्के माल हा दुबई, बहरीन, कतार, कुवेत, सौदी अरेबिया आणि जॉर्डन या आखाती देशांमध्ये जातो. उर्वरित १० टक्के निर्यात इतर देशांमध्ये होते. सध्या वाशी मार्केटमध्ये दररोज ६० ते ७० पेट्यांची आवक होत असून ५ ते ७ डझनच्या पेटीला ६ ते १२ हजार रुपये इतका चांगला दर मिळत आहे. मात्र, २५ मार्चनंतर आवक वाढण्याची शक्यता असून, त्याच काळात युद्ध सुरू राहिल्यास निर्यात होणारा माल स्थानिक बाजारपेठेतच अडकून पडेल. परिणामी, बाजारात आंब्याची उपलब्धता वाढून दरांवर दबाव येण्याची शक्यता आहे.
राज्याची निर्यात स्थिती
भारतातून दरवर्षी एकूण २९ हजार मेट्रिक टन आंब्याची निर्यात केली जाते. यामध्ये महाराष्ट्र राज्याचा वाटा साडेपाच हजार मेट्रिक टन असून, त्यापैकी अडीच हजार मेट्रिक टन आंबा एकट्या कोकणातील आहे. तज्ज्ञांच्या मते, जर बाजारपेठेत एक लाखापेक्षा जास्त पेट्यांची आवक झाली, तर दर कोसळण्याची शक्यता आहे. मात्र, उत्पादन कमी असल्याने आवक मर्यादित राहिली, तर दर स्थिर राहू शकतात. सद्यस्थितीत, युद्धाचा कालावधी किती लांबतो, यावरच हापूसच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराचे भवितव्य अवलंबून आहे.



