आंबोली घाटात बुधवारी सायंकाळी कारने पेट घेतल्यानंतर जळून ठार झालेल्या महिलेची ओळख गुरुवारी पटली. रिझवाना अस्लम पाथरवट (40) असे तिचे नाव असून ती बेळगाव–वैभवनगर येथील आहे. ती जखमी कारचालक दुंडाप्पा बंगारेप्पा पद्मण्णावर (44) याची पत्नी नसल्याचे उघड झाले आहे. जखमी दुंडाप्पा याला गोवा–बांबोळी येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
दरम्यान, रिझवाना हिचे नातेवाईक गुरुवारी आंबोली पोलीस दूरक्षेत्रात हजर झाले. त्यांनी रिझवानची ओळख पटविली. पद्मण्णावर हा रिझवानाचा फॅमिली डॉक्टर होता. तिला फीट येत असल्याने तो तिच्यावर उपचार करायचा, अशी माहिती नातेवाईकांनी पोलिसांना दिली.
बुधवारी सायंकाळी मृत रिझवाना हिचा मुलगा आमिर याने आपले भावोजी मैनुद्दीन महम्मद शेख (रा. आजरा) यांना कॉल करून आईचा मोबाईल दोन–तीन दिवस लागत नाही. तसेच आंबोली पोलिसांनी घाटात कारने पेट घेऊन एक महिला जळाल्याचे सांगितल्याचे कळविल्याचे सांगितले. त्यानंतर जावई मैनुद्दीन यांनी रिझवाना यांचे भाऊ मुश्ताक अब्दुल रेहमान मुधौळ (41) कल्पना दिली. त्यानंतर गुरुवारी नातेवाईकांनी आंबोली पोलीस ठाण्यात येऊन सीसीटीव्ही फुटेज पाहिले. त्यावेळी त्या कारमधील महिला आपली सासू असल्याचे मैनुद्दीन यांनी ओळखले. तसेच सासूनेच आपल्याला दुंडाप्पा याची ओळख आपला फॅमिली डॉक्टर म्हणून करून दिल्याचे पोलिसांना सांगितले.
रिझवाना हिच्या पतीचे निधन झाले आहे. तिला दोन मुले आहेत. मुलीचे लग्न झाले असून ती आजरा येथे राहते. तर मुलगा आमिर नोकरीसाठी चेन्नईत असतो. रिझवाना हिला फीट येण्याची सवय होती. त्यामुळे दुंडाप्पा तिच्यावर उपचार करत होता. तो तिचा फॅमिली डॉक्टर म्हणून काम करत होता.
कारला धडक देऊन पलायन
दरम्यान, कारने पेट घेण्यापूर्वी आंबोली घाटातून चौकुळ येथे जाणाऱया सत्यप्रकाश गावडे यांच्या कारला धडक दिली होती. त्यावेळी गावडे यांनी सदर कार थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो पळून गेला. गावडे यांनी याची माहिती पोलिसांना दिली होती. दाणोली येथे पोलिसांना कारची माहिती देण्यात आली. मात्र, तत्पूर्वीच या कारने काही अंतरावर पेट घेतल्याचे उघड झाले. हा अपघात की घात, याबाबत शंका निर्माण झाल्या असून पोलीस सखोल चौकशी करणार आहेत.
दुंडाप्पा याला बुधवारी रात्री गोवा–बांबोळी येथे उपचारासाठी हलविण्यात आल्यानंतर तेथे त्याचे नातेवाईक नसल्याने तेथे उपचारासाठी दाखल करून घेण्यास नकार देण्यात आला. मात्र, 108 रुग्णवाहिकेच्या चालकाने जिल्हा आरोग्य अधिकाऱयांशी संपर्क साधला. त्यानंतर आरोग्य अधिकाऱयांनीं गोव्यातील अधिकाऱयांशी संपर्क साधला. त्यानंतर त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, दुंडाप्पा याचा मित्रपरिवार गोवा–बांबोळी येथे आला आहे.
ग्रीन व्हॅली, तारकर्लीत होते मुक्कामाला
आंबोली घाटात बुधवारी सायंकाळी सावंतवाडीच्या दिशेने येणाऱया कारने पेट घेतला. त्यात महिला कारमध्ये जळून ठार झाली होती. तर कारचालकाने उडी मारल्याने तो बचावला. परंतु तो जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तो बोलण्याच्या मनस्थितीत नसल्याने त्याची ओळख पटली नव्हती. परंतु सावंतवाडी पोलिसांनी आंबोली दूरक्षेत्रात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱयाद्वारे कारचा शोध लावण्यात आला. पोलिसांनी केलेल्या चौकशीत कारचालक असलेला दुंडाप्पा आंबोली येथील ग्रीन व्हॅली हॉटेलमध्ये 16 मार्चला राहण्यासाठी आला होता. तो तेथून 17 मार्चला बाहेर पडला. त्या दिवशी त्यांचा मुक्काम मालवण–तारकर्ली येथील श्री गणेश होम स्टे येथे होता. 18 रोजी त्यांनी तेथील रुम सोडली होती, असे निष्पन्न झाले. त्याने आंबोलीत हॉटेलमध्ये दिलेल्या ओळखीच्या पुराव्यावरून त्याची ओळख पटली.
अपघातप्रकरणी तक्रार
कारला धडक दिल्याप्रकरणी सत्यप्रकाश गावडे यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. अपघातप्रकरणी दुंडाप्पा याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरधाव वेगाने कार चालवून स्वत:च्या दुखापतीस, महिलेच्या मृत्यूला कारणीभूत आणि तक्रारदार यांच्या वाहनाच्या नुकसानीला कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक तौसिफ सय्यद यांनी दिली. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांच्या मार्गदर्शनाखाली तौसिफ सय्यद, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाबू तेली, हवालदार गुरू तेली, पोलीस नाईक राजेश गवस, गजानन देसाई करत आहेत.