नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर पसरलेल्या आणि महाराष्ट्रातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी (मालवण) येथील भराडी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाची तारीख निश्चित झाली आहे. देवीने कौल दिल्यानुसार सोमवार १७ फेब्रुवारी २०२० रोजी आंगणेवाडी यात्रा होणार आहे. आज (रविवार) ८ डिसेंबर रोजी आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक झाल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली. आंगणेवाडी मंडळाने याबाबत माहिती दिली.
दरवर्षी यात्रेची तारीख निश्चित करण्यासाठी प्रथे प्रमाणे पारध करण्यात आली. देवीला प्रसाद लावण्यात आला. धार्मिक कार्यक्रमानंतर देवीने दिलेल्या आदेशा नुसार जत्रोत्सवाची तारीख ग्रामस्थांनी जाहीर केली. यात्रेची तारीख निश्चित झाल्याने चाकरमानी व बाहेरगावी नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने असलेल्या भाविकामध्ये तिकीट बुकिंगची लगबग सुरू झाली आहे.
लाखो भक्तांना देवीच्या दर्शनाची अत्यंत सुलभ व्यवस्था करून आपल्या दर्जेदार नियोजनाचा आदर्श आंगणेवाडी मंडळाने महाराष्ट्रा समोर उभा केला आहे. दोन दिवस चालणाऱ्या या यात्रोत्सवात यावर्षी भाविकांची गर्दी अधिक वाढेल असा अंदाज वर्तवला जात आहे.