अस्सल देवगड हापूससाठी नवा युनिक आयडी कोड

0
5
बनावट आंब्यांवर आळा बसणार !
सिंधुदुर्ग – पुणे-मुंबईसह महाराष्ट्रातील गल्लीबोळांत विकला जाणारा ‘देवगड हापूस’ आंबा प्रत्यक्षात देवगडमध्ये पिकतही नाही, अशी मोठी शंका अनेक ग्राहकांना असते. बाजारात मोठ्या प्रमाणावर बनावट ‘देवगड हापूस’ची विक्री होत असून, खऱ्या उत्पादकांचे आर्थिक नुकसान आणि ग्राहकांची फसवणूक वाढली आहे. यावर तोडगा म्हणून देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्था मर्यादित यांनी ऐतिहासिक पाऊल उचलले आहे.
यंदाच्या हंगामापासून टँपर प्रूफ युनिक आयडी (TP Seal UID) असलेले स्टीकर प्रत्येक अस्सल देवगड हापूस आंब्यावर लावणे सक्तीचे करण्यात आले आहे. त्यामुळे यापुढे केवळ UID असलेले आंबेच ‘देवगड हापूस’ किंवा ‘देवगड अल्फोन्सो’ या नावाने विक्री करता येणार आहेत.
बनावट हापूसला पूर्णविराम !
संस्थेचे संचालक सदस्य अ‍ॅड. ओंकार सप्रे यांनी सांगितले, “गेल्या काही दशकांपासून देवगड हापूसच्या नावाखाली इतर भागांतील निकृष्ट दर्जाचे आंबे विकले जात आहेत. प्रत्यक्षात ८० टक्के पेक्षा जास्त आंबे देवगडमधील नसतात, यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी जीआय (GI) टॅगच्या कायदेशीर अधिकारांचा वापर करत UID सील सक्तीचे करण्याचा निर्णय घेतला आहे.”
या उपक्रमामुळे खरे आणि बनावट हापूस यामध्ये स्पष्ट भेद करता येणार आहे. ग्राहकांना अस्सल GI प्रमाणित देवगड हापूस मिळावा, तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य मोबदला मिळावा, यासाठी सन सोल्यूशन्स या संस्थेसोबत विशेष करार करण्यात आला आहे.
UID स्टिकरमुळे काय फायदे?
•अस्सल देवगड हापूसची ओळख सहज पटणार
•बनावट आंब्यांची विक्री रोखली जाईल
•ग्राहकांना योग्य दरात दर्जेदार हापूस मिळेल
•शेतकऱ्यांना त्यांचा खरा फायदा होईल
हा UID स्टिकर पाहूनच देवगड हापूस खरेदी करा! ग्राहकांनीही फसवणूक टाळण्यासाठी UID असलेल्या आंब्यांचीच निवड करावी, असे आवाहन देवगड आंबा उत्पादक संस्थेने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here