असलदे धनगरवाडी येथे भरते दोन तासांची लॉकडाऊन मधली शाळा

0
389

 

सिंधुदुर्ग – कोरोनामुळे शाळा कधी सुरू होतील, याबाबत निश्चितता नाही. असे असतानाच ऑनलाईन वा इतर मार्गांचा वापर करून मुलांना शैक्षणिक प्रवाहात ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, आजही सिंधुदुर्ग जिल्ह्यात असे काही भाग आहेत, की जेथे ना इंटरनेट, ना पालकांजवळ इंटरनेटसाठी आवश्यक असलेले फोन. अशीच स्थिती असलेल्या असलदे धनगरवाडीतील मुलांसाठी 15 जूनपासून वाडीतच रोज दोन तासांची शाळा भरू लागली आहे. वाडीतील पदवीधर तरुणी असलेल्या सविता जानू खरात हिने ही शाळा सुरू केली आहे.

आज सर्वत्र शाळा बंद पण शिक्षण सुरू, अशी स्थिती आहे. प्रशासकीय पातळीवर विविध ऍप, ऑनलाईन, गरजेनुसार शक्य असल्यास ऑफलाईन अशाप्रकारे मुलांना शिक्षण देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कोरोनाच्या भितीमुळे शिक्षक वा मार्गदर्शकही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकत नाहीत. यावर पर्याय काढण्याचे काम असलदे धनगरवाडी येथील सविता जानू खरात या पदवीधर तरुणीने केला आहे. तिने 15 जूनपासून पहिली ते सातवीपर्यंतच्या 13 मुलांना रोज सायंकाळी 5 ते 7 यावेळेत वाडीतच शिक्षण देण्यास सुरुवात केली. तीही मास्क व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करूनच. तिच्या या वर्गात असलदे तावडेवाडी व नांदगाव सरस्वती हायस्कूलमध्ये जाणारी तिच्या वाडीतील मुले आहेत. 15 जूनपासून ती या मुलांना रोज दोन तास शिक्षण देते, असे सविताने सांगितले. पदवीधर असलेली सविता फणसगाव कॉलेजमध्ये कॉम्प्युटर लॅबमध्ये कार्यरत आहे. तिचे वडील शेतकरी आहेत. घरची स्थितीही बेताचीच. मात्र, लॉकडाऊनच्या काळात असेच घरी बसून राहण्यापेक्षा आपल्या वाडीतील मुलांना शिक्षण देण्याचा उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याचे तिने सांगितले.

असलदे गावचे सरपंच पंढरी वायंगणकर यांनी या उपक्रमाला सहकार्याची भावना दाखवली. आज शिक्षणाचे महत्व लक्षात घेता कोरोनाच्या काळात काय करावे हा प्रश्न सर्वांसमोर आहे. अशावेळी सवितासारखी स्वतःहून पुढे येते आणि मुलांना शिकवते यातून आम्हाला एक आशेचा किरण दिसू लागला आहे. अन्य गावातही अशाचप्रकारे मुले समोर आली तर कोरोनातील शिक्षणाचा प्रश्न काही प्रमाणात सुटू शकतो असे सरपंच पंढरी वायंगणकर म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here