सिंधुदुर्ग : आरोंदा येथील तेरेखोल खाडी पात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू व्यावसायिकांना आज महसूल प्रशासनाकडून चांगलाच दणका देण्यात आला. अवैध वाळू उपसा करणाऱ्या चार बोटी महसूल प्रशासनाकडून जाळण्यात आल्या. तसेच येथील कामगारांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई आज पहाटे ग्रामस्थांच्या मदतीने तहसीलदार राजाराम म्हात्रे व त्यांच्या पथकाकडून करण्यात आली.
आरोंदा येथील तेरेखोल खाडीत मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळू उपसा होत असल्याच्या अनेक तक्रारी महसूल प्रशासनाकडे आल्या होत्या. अनेक वेळा कारवाईचा इशारा देऊनही ही वाळू उपसा थांबत नव्हती. त्यामुळे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी या विरोधात धडक कारवाई करण्याचे ठरविले. त्यानुसार सोमवारी पहाटे तहसीलदारांनी आपल्या पथकासह घटनास्थळी जाऊन ही धडक कारवाई केली.
यामध्ये तीन ते चार बोटी जप्त करून त्या जाळण्यात आल्या. दरम्यान सावंतवाडी तालुक्यात अशाप्रकारे ही प्रथमच कारवाई करण्यात आली आहे. यावेळी बोटीवर असलेल्या कामगारांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. या बोटीचे मालकही लवकरच शोधून काढण्यात येतील, असेही तहसीलदार म्हात्रे यांनी स्पष्ट केले आहे.