राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत एक अत्यंत मोठी आणि महत्त्वाची माहिती समोर आली आहे. एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) ने या अपघाताबाबत पहिल्यांदाच आपले अधिकृत स्पष्टीकरण दिले आहे. या स्पष्टीकरणानुसार, विमानातील ब्लॅक बॉक्स म्हणजेच दोन्ही रेकॉर्डर आगीमुळे प्रचंड तापले होते आणि त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे, अशी माहिती तपास यंत्रणेने दिली आहे.
विमान अपघात तपास ब्युरोने जारी केलेल्या निवेदनानुसार, अपघातानंतर विमानाला जी आग लागली होती, त्यामध्ये हे दोन्ही रेकॉर्डर बराच वेळ राहिले होते. उच्च तापमानामुळे आणि आगीच्या ज्वाळांमुळे या उपकरणांवर गंभीर परिणाम झाला आहे. असे असले तरी, तपास यंत्रणेला यातील एका भागातून म्हणजेच L3 संभाषणाचा डेटा रिकव्हर करण्यात (मिळवण्यात) यश आले आहे, ही या तपासातील एक सकारात्मक बाब मानली.
दुसरीकडे, कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डरच्या (CVR) तांत्रिक तपासणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हे रेकॉर्डर ‘हनीवेल’ या कंपनीने बनवलेले आहेत. त्यामुळे या उपकरणांच्या सखोल तपासासाठी संबंधित देशातील अधिकृत प्रतिनिधींची मदत घेण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय मानकांनुसार आणि पुराव्यांच्या आधारावरच हा तपास सुरू असल्याचे ब्युरोने स्पष्ट केले आहे.
या घटनेबाबत सध्या अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. मात्र, अशा कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता किंवा स्वतःचे अंदाज न बांधता, सुरू असलेल्या अधिकृत तपास प्रक्रियेवर विश्वास ठेवावा, असे आवाहन विमान अपघात तपास ब्युरोने केले आहे. आम्ही पुराव्यांच्या आधारे पारदर्शकपणे तपास करत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी पाच दिवसांपूर्वीच ब्लॅक बॉक्स खराब होण्याबाबत शंका उपस्थित केली होती. आज ती शक्यता खरी ठरत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. “कंपनीला कुणाचा पाठिंबा आहे का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला असून, हा अपघात होता की घातपात, याचे उत्तर मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
२८ जानेवारी रोजी मुंबईहून बारामतीला जाताना लँडिंगच्या वेळी हा दुर्दैवी अपघात घडला होता, ज्यामध्ये अजित पवार यांच्यासह पाच जणांना आपला जीव गमवावा लागला होता. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला असून आता ब्लॅक बॉक्सच्या तपासातून नेमके काय सत्य बाहेर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



