अजित पवार गेल्याने एकत्र येण्याच्या चर्चेला खंड, शरद पवार यांचे मोठे विधान

0
2

मुंबई-उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर राज्याच्या राजकारणात सुरू असलेल्या घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे प्रमुख शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सुनेत्रा पवार यांच्या संभाव्य शपथविधीबाबत आपल्याकडे कोणतीही अधिकृत माहिती नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

शपथविधी हा त्यांच्या पक्षाचा निर्णय

पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार म्हणाले, सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचं वाचनात आलं आहे. मात्र, हा निर्णय त्यांच्या पक्षाने घेतलेला दिसतो आणि तो पूर्णपणे पक्षाचा अंतर्गत विषय आहे. यावर अधिक भाष्य करणं योग्य ठरणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

एकत्र येण्याच्या चर्चेत मी सहभागी नव्हतो

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याच्या चर्चांबाबत बोलताना शरद पवार यांनी महत्त्वाचा खुलासा केला. गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेल्या या चर्चांचं नेतृत्व अजित पवार आणि जयंत पाटील करत होते. त्या बैठकींमध्ये आपण सहभागी नव्हतो, असं सांगत त्यांनी आता या प्रक्रियेत खंड पडल्याचं चित्र दिसत असल्याचं नमूद केलं. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याकडे निर्णयाचे अधिकार असून त्यांनी पुढचा मार्ग ठरवलेला दिसतो, असंही शरद पवार म्हणाले.

अजित पवारांचं जाणं महाराष्ट्रासाठी मोठा धक्का

अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनावर बोलताना शरद पवार भावूक झाले. ते म्हणाले, हा आघात केवळ कुटुंबावर नाही तर संपूर्ण महाराष्ट्रावर आहे. अजित पवार हे अत्यंत कर्तृत्ववान नेते होते. रोज सकाळी लवकर कामाला सुरुवात करणं आणि सतत फिल्डवर असणं, ही त्यांची ओळख होती. आज ते हयात असते, तर घरात नव्हे तर कामातच दिसले असते, असं त्यांनी सांगितलं.

नव्या पिढीवर मोठी जबाबदारी

या परिस्थितीनंतर आता जबाबदारी वाढल्याचं सांगत शरद पवार म्हणाले, लोकांच्या दुःखाची दखल घेत संवेदनशीलतेने पुढचं काम करावं लागेल. अजित पवार यांनी ज्या पद्धतीने काम केलं, ती परंपरा आमच्या कुटुंबातील आणि पक्षातील नवी पिढी पुढे नेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

१२ तारखेला निर्णय जाहीर होणार होता

दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी एकत्र काम करण्याच्या प्रक्रियेवर तत्त्वतः एकमत झालं होतं. या संदर्भात १२ तारखेला अधिकृत निर्णय जाहीर करण्याचं ठरलं होतं, अशी माहितीही शरद पवार यांनी दिली. मात्र सध्याच्या घडामोडींमुळे या प्रक्रियेचं भवितव्य अनिश्चित झालं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here