अजित पवारांच्या निधनाच्या दिवशीच मंत्रालयात धक्कादायक प्रकार, मुख्यमंत्र्यांनी “त्या” निर्णयाला दिली स्थगिती!

0
2

मुंबई – राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी सकाळी अपघाती निधन झाले. या घटनेमुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली असतानाच मंत्रालयातील काही अधिकाऱ्यांनी मात्र संवेदनशूनतेचा कळस गाठल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अजितदादांच्या निधनाच्या दिवशीच मंत्रालयातील अल्पसंख्यांक विभागात फायलींवर सह्यांचा सपाटा लावून वादग्रस्त निर्णयांची अंमलबजावणी करण्यात आली. या गंभीर बाबीची दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित निर्णयांना तातडीने स्थगिती दिली असून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.

​मिळालेल्या माहितीनुसार, २८ जानेवारीला सकाळी पावणे नऊच्या सुमारास अजित पवार यांचे निधन झाले. एकीकडे संपूर्ण राज्य दुःखात बुडाले असताना, दुसरीकडे मंत्रालयात मात्र वेगळंच काम सुरू होतं. त्याच दिवशी दुपारी तीनच्या सुमारास अल्पसंख्यांक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुमारे ७५ शाळांना अल्पसंख्यांक दर्जाची प्रमाणपत्रे वाटप केल्याची माहिती उघड झाली आहे. अत्यंत घाईगडबडीत आणि नियम डावलून हा प्रकार केल्याचा आरोप होत आहे. दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना अधिकाऱ्यांनी दाखवलेल्या या संवेदनशून्य कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

​या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक पावले उचलली आहेत. ज्या दिवशी राज्याच्या ज्येष्ठ नेत्याचे निधन झाले, त्याच दिवशी अशा प्रकारे निर्णय घेणे आणि प्रमाणपत्रे वाटणे हे अत्यंत चुकीचे आणि संतापजनक असल्याचे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी अल्पसंख्यांक विभागाने त्या दिवशी घेतलेल्या सर्व निर्णयांना तात्काळ स्थगिती दिली आहे. तसेच, या प्रकरणाची सखोल उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले असून, यात दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.

​युवक काँग्रेसचे सरचिटणीस अक्षय जैन यांनी या प्रकरणात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. शाळांना अल्पसंख्यांक दर्जा देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल झाल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच, राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनीही या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. संबंधित शिक्षण संस्थांना अशा प्रकारे दर्जा देणे धक्कादायक असून, या प्रकरणाची सीआयडी (CID) मार्फत चौकशी करण्यात यावी आणि दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी प्यारे खान यांनी केली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर गुपचूपपणे झालेला हा प्रकार उजेडात आल्यानंतर आता प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असून चौकशीत काय समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here