अजित पवारांचे मुंबई विमानतळावरील CCTV फुटेज देण्यास केंद्राचा नकार, अपघाताच्या संशयाची सुई अधिक गडद

0
4

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती येथे विमान अपघाताच्या आधीचे विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज माहिती अधिकार कायद्यांतर्गत (RTI) देण्यास केंद्रीय नागरी सुरक्षा वाहतूक विभागाने स्पष्ट नकार दिला आहे. या निर्णयामुळे अपघाताच्या संशयाची सुई अधिक गडद झाली असून राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे.
बारामती येथील माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी १० फेब्रुवारी रोजी अर्ज दाखल केला होता. यामध्ये त्यांनी २८ जानेवारी २०२६ रोजी मुंबई विमानतळावरील पहाटे ६ ते सकाळी ९ या वेळेतील सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली होती. अजित पवार यांच्या विमानाला झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर वस्तुस्थिती समोर यावी, हा यामागचा उद्देश होता. मात्र, केंद्रीय विभागाने सुरक्षेच्या कारणास्तव ही माहिती देण्यास असमर्थता दर्शवत अर्ज फेटाळून लावला आहे.
अर्ज फेटाळल्यानंतर नितीन यादव यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. “वारंवार पाठपुरावा करूनही महत्त्वाची माहिती नाकारली जात आहे. जर काही लपवण्यासारखे नसेल, तर फुटेज का दिले जात नाही? यामुळे अजितदादांचा खरोखरच घातपात झाला का ? हा प्रश्न आता अधिक गंभीर झाला आहे,” असे यादव यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here