मुंबई- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अपघात की घातपात, या चर्चेने राजकारण तापलेले असताना आता खासदार सुप्रिया सुळे यांनी यावर आपली महत्त्वाची भूमिका मांडली आहे. रोहित पवारांनी उपस्थित केलेले प्रश्न अतिशय गंभीर आणि पारदर्शक असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे; त्यामुळे आम्ही आता या चौकशीची वाट पाहणार असल्याचे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले. रोहित पवारांची अस्वस्थता स्वाभाविक असल्याचे सांगत त्यांनी या प्रकरणातील गूढ उकलण्याची गरज अधोरेखित केली.
रोहित पवार यांनी यापूर्वीच काही धक्कादायक प्रश्न उपस्थित केले होते. अजित पवार यांचा मूळ प्लॅन कारने प्रवासाचा असताना, आदल्या रात्री काही कारणे काढून त्यांचा मुंबईतील मुक्काम वाढवण्यात आला आणि दुसऱ्या दिवशी त्यांना विमानाने जाण्यास भाग पाडले गेले का, असा संशय त्यांनी व्यक्त केला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, विमानाचे दोन्ही पायलट ऐनवेळी का बदलण्यात आले, हा प्रश्न त्यांनी लावून धरला आहे. या संशयास्पद बाबींवर बोट ठेवत रोहित पवारांनी एका पूर्व विदर्भातील नेत्याचेही नाव घेतले होते, मात्र त्याबद्दल आपल्याला अधिक माहिती नसल्याचे सुप्रिया सुळे यांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. आता मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर या प्रकरणाची चौकशी काय वळण घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



