कणकवली: कणकवलीतील नामांकित बांधकाम व्यावसायिक सुशांत दळवी यांच्या हत्येमुळे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा हादरला असून, या प्रकरणाचा तपास आता नव्या वळणावर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी अमर सत्यवान कदम याला ताब्यात घेतले असले, तरी या हत्येमागे मोठे राजकीय षडयंत्र आणि ‘सुपारी किलर’चा हात असल्याचा संशय व्यक्त करत आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आज उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन दिले.
शुक्रवार, २७ मार्च २०२६ रोजी हरकुळ गावात सुशांत दळवी यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने अमर कदमला ताब्यात घेतले. मात्र, निवेदनात नमूद केल्यानुसार, ज्या पद्धतीने ही हत्या करण्यात आली, ते पाहता हे एखाद्या अट्टल गुन्हेगाराचे काम असल्याचे स्पष्ट होत आहे. अमर कदम याला केवळ आमिष दाखवून ‘मोहरा’ म्हणून वापरले गेले असावे किंवा शिकारीच्या बहाण्याने दळवी यांना घटनास्थळी आणून तिथे दबा धरून बसलेल्या अन्य आरोपींनी ही हत्या केली असावी, असा दाट संशय व्यक्त करण्यात येत आहे.
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, सुशांत दळवी यांनी दोन महिन्यांपूर्वीच कणकवली पोलिसात आपल्या जीवितास धोका असल्याची तक्रार दिली होती. या तक्रारीत त्यांनी मुंबईतील काही वजनदार राजकीय व्यक्तींच्या नावांचा उल्लेख केला होता. या तक्रारीकडे दुर्लक्ष झाले का? आणि त्या राजकीय दबावातूनच ही हत्या झाली आहे का? या दिशेने तपास करण्याची मागणी विवेक ताम्हणकर आणि उपस्थित मान्यवरांनी केली आहे.
एवढी मोठी आणि संवेदनशील घटना घडूनही जिल्हा पोलीस प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही, याबद्दलही निवेदनातून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. “सिंधुदुर्ग हा शांतताप्रिय जिल्हा आहे. अशा घटनांमुळे जिल्ह्याची बदनामी होत असून, पोलिसांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता खरे आरोपी समोर आणावेत,” अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी विवेक ताम्हणकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस निरीक्षक तेजस नलावडे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) जिल्हा सरचिटणीस रूपेश जाधव, कृषी सेल जिल्हाध्यक्ष समीर आचरेकर, काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष अतिश उर्फ भाई जेठे, डी. डी. कदम, नितेश मेस्त्री आदी पदाधिकारी उपस्थित होते.
या निवेदनाच्या प्रती पालकमंत्री, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि पोलीस निरीक्षक यांनाही माहितीसाठी पाठवण्यात आल्या आहेत.



