मुंबई: सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाल्यानंतर टीका करणाऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे रिक्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी त्यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आली असून, त्यांचा उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी लोकभवन येथे साध्या पद्धतीने पार पडला. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. मात्र, या निवडीवरून राजकीय वर्तुळात वादाला तोंड फुटले असून शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी सुनील तटकरे यांच्यावर गलिच्छ राजकारण केल्याचा आरोप केला आहे. शरद पवार यांना शह देण्यासाठी तटकरे यांनी सुनेत्रा वहिनींना या पदासाठी भाग पाडले, अशी टीका कदम यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक शब्दांत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली असून सुरू असलेला हा वाद-विवाद अत्यंत निरर्थक आणि चुकीचा असल्याचे म्हटले आहे.
मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातले एक मोठे नेते अजित पवार आपल्यातून निघून गेल्यानंतर प्रत्येक व्यक्ती या घटनेत स्वतःचे राजकारण शोधण्याचा प्रयत्न करत आहे, हे दुर्दैवी आहे. अशा प्रकारचे खालच्या पातळीचे राजकारण आता बंद झाले पाहिजे. प्रसंग अत्यंत कठीण असतानाही सुनेत्रा वहिनींनी महाराष्ट्राच्या हितासाठी जो धीरोदात्त निर्णय घेतला, तो कौतुकास्पद आणि धाडसी आहे.
हा प्रसंग शुभेच्छा देण्याचा नसला तरी, अजितदादांचा वारसा त्या समर्थपणे चालवतील याची आपल्याला खात्री असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. राज्याला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री लाभल्या असून त्यांची ही कारकीर्द यशस्वी ठरेल असा विश्वास व्यक्त करत, भाजप आणि महायुती सरकार या कठीण काळात पवार कुटुंबाच्या खंबीरपणे पाठीशी उभे असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.



