सिंधुदुर्गात भाजपमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर; रवींद्र चव्हाणांच्या भूमिकेवर राणे समर्थकांचा गंभीर आरोप

0
2

सिंधुदुर्ग जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने घवघवीत यश मिळवले असले तरी, या विजयाला अंतर्गत वादाची किनार लाभली आहे. कोकणात नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने आपले वर्चस्व सिद्ध केले असले तरी, अनेक ठिकाणी अपक्ष उमेदवारांनी मारलेली बाजी आता वादाचे मुख्य कारण ठरली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे जाणीवपूर्वक भाजपच्याच अधिकृत उमेदवारांच्या विरोधात अपक्षांना बळ देत असल्याचा खळबळजनक आरोप राणे समर्थक नेत्यांकडून करण्यात येत आहे. यापूर्वी नगरपरिषद निवडणुकीवेळी आमदार नितेश राणे यांनी चव्हाण यांच्यावर ‘महायुतीत मिठाचा खडा’ टाकत असल्याची टीका केली होती, त्याचेच पडसाद आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतही उमटताना दिसत आहेत.

सावंतवाडी तालुक्यात भाजपच्या काही दिग्गज उमेदवारांचा पराभव करत अपक्ष उमेदवारांनी विजय मिळवला असून, या विजयामागे ‘अदृश्य शक्ती’ असल्याचा दावा नितेश राणे यांनी केला आहे. छातीवर कमळाचे चिन्ह लावून फिरणारे काही नेते प्रत्यक्ष निवडणुकीत मात्र पक्षाच्याच उमेदवाराला पाडण्यासाठी रसद पुरवत असल्याची संतप्त भावना त्यांनी व्यक्त केली. कोलगाव जिल्हा परिषद गटातून निवडून आलेले अपक्ष उमेदवार मायकेल डिसूजा यांनी आपल्या विजयाचे श्रेय थेट रवींद्र चव्हाण यांना दिल्याने या वादात आगीत तेल ओतले गेले आहे. त्यातच चव्हाण यांचे मेहुणे विनोद राऊळ हे अपक्षांच्या विजयाचा जल्लोष करताना दिसल्याने आणि विजयाच्या बॅनरवर चव्हाणांचे फोटो झळकल्याने भाजपमधील हा अंतर्गत संघर्ष अधिकच गडद झाला आहे.

या वादात आता भाजपच्या अधिकृत उमेदवारांनीही उघडपणे आपली नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. माडखोल गटातील भाजपच्या अधिकृत उमेदवार सुप्रिया मडगावकर यांचे पती रवींद्र मडगावकर यांनी थेट आरोप केला आहे की, राणे समर्थक असल्यामुळेच त्यांच्या विरोधात विनोद राऊळ यांच्या माध्यमातून अपक्ष उमेदवार उभे करून पक्षाशी प्रतारणा करण्यात आली. सावंतवाडी तालुक्यातील माडखोल, कोलगाव आणि इन्सुली यांसारख्या महत्त्वाच्या गटात अपक्षांनी मिळवलेला विजय हा भाजपच्या प्रदेश नेतृत्वाकडूनच पुरस्कृत असल्याचा दावा केला जात आहे. एकीकडे प्रदेशाध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण पक्षवाढीचा दावा करत असताना, दुसरीकडे त्यांच्यावरच जिल्ह्यातील नेत्यांचे पंख छाटण्याचे आरोप होत असल्याने सिंधुदुर्ग भाजपमधील हा वाद येणाऱ्या काळात कोणते वळण घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here