सिंधुदुर्ग – पवनार (वर्धा) ते पत्रादेवी (सिंधुदुर्ग) असा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग आता भूसंपादनाच्या अंतिम टप्प्यात पोहोचला असून या प्रकल्पामुळे सिंधुदुर्ग जिल्हा थेट राज्याच्या मध्यभागाशी जोडला जाणार आहे. मार्गमोजणीची प्रक्रिया पूर्ण झाली असून प्रशासनाने कामाला वेग दिला आहे.
ऑगस्ट महिन्यात सांगलीपर्यंतच्या आखणीस व भूसंपादनास मंजुरी देण्यात आल्यानंतर आतापर्यंत १५० हून अधिक गावांतील जमिनीची मोजणी यशस्वी झाली आहे. पहिल्या टप्प्यासाठी तब्बल २०,७८७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून तांत्रिक कामे पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत.
हा महामार्ग वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, सोलापूर, कोल्हापूर आणि अखेरीस सिंधुदुर्ग अशा १२ जिल्ह्यांतील ३९ तालुके व ३७० गावांमधून जाणार आहे. अलीकडे आराखड्यात बदल करून कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्याचा समावेश करण्यात आल्याने महामार्गाची लांबी ४४० किलोमीटरपर्यंत वाढली आहे.
१८ धार्मिक स्थळे एकाच मार्गावर
या महामार्गाचे वैशिष्ट्य म्हणजे राज्यातील माहूर, तुळजापूर व कोल्हापूर ही प्रमुख शक्तीपीठे तसेच परळी वैजनाथ, औंढा नागनाथ, पंढरपूर, नरसोबाची वाडी आदी एकूण १८ धार्मिक स्थळे या एकाच मार्गाने जोडली जाणार आहेत.
सिंधुदुर्गसाठी विकासाचे नवे दालन
महामार्गाचा शेवट पत्रादेवी येथे होणार असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात धार्मिक पर्यटन, वाहतूक, व्यवसाय आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत. कोकणातील दुर्गम भाग मुख्य प्रवाहाशी जोडला जाणार असल्याने जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे.



