मुंबई – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाची प्रक्रिया सध्या अनिश्चिततेच्या गर्तेत अडकली आहे. या पार्श्वभूमीवर, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी लिहिलेल्या एका विशेष लेखामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. दोन्ही गट एकत्र आल्यास आपण अजितदादांच्याच नेतृत्वाखाली काम करणार होतो, असा खळबळजनक खुलासा शिंदेंनी या लेखात केला आहे. मात्र, या दाव्यावर अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सावध भूमिका घेत आपली स्पष्ट मते मांडली आहेत.
शशिकांत शिंदे यांनी आपल्या लेखात असे नमूद केले आहे की, अदृश्य शक्तींच्या कारवाया, धमक्या आणि रचलेल्या षडयंत्रांमुळे अजितदादांना राष्ट्रवादीतून बाहेर पडावे लागले होते, परंतु गेल्या चार-पाच महिन्यांपासून ते ही ‘चूक’ दुरुस्त करण्यासाठी प्रयत्नशील होते. शिंदे यांच्या या विशिष्ट विधानावर सुनील तटकरे यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. अजितदादा आपली चूक दुरुस्त करणार होते, हे वाक्य आपल्याला मान्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तटकरे यांच्या मते, पक्ष सोडण्याचा निर्णय हा ‘चूक’ नव्हता, त्यामुळे ती दुरुस्त करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
विलीनीकरणाच्या शक्यतेबाबत बोलताना तटकरे म्हणाले की, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात ही दादांची इच्छा होती का, यावर पक्षाच्या विद्यमान नेत्या आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच पक्षाचे इतर ज्येष्ठ नेते चर्चा करून निर्णय घेतील. तसेच, कोणताही पक्ष जेव्हा आघाडीत असतो, तेव्हा त्या आघाडीतील प्रमुख पक्षाला विश्वासात घेणे आवश्यक असते. सध्या हा गट एनडीएसोबत असून भाजप हा त्यातील मुख्य घटक पक्ष आहे, याची आठवणही त्यांनी करून दिली. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी गट आता विलीनीकरणाबाबत काय अधिकृत भूमिका घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



