मुंबई: महाराष्ट्रातील ग्रामीण राजकारणाची ‘मिनी विधानसभा’ मानल्या जाणाऱ्या १२ जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज, ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ७:३० वाजल्यापासून उत्साहात मतदानाला सुरुवात झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या या निवडणुकीसाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सज्ज असून, सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.
या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या एकूण ७३१ जागांसाठी आणि पंचायत समित्यांच्या १,४६२ जागांसाठी मतदान होत आहे. निवडणूक रिंगणात एकूण ७,४३८ उमेदवार आपले नशीब आजमावत असून, राज्यातील २ कोटी ८ लाख २० हजार ७०२ मतदार या उमेदवारांचे राजकीय भवितव्य ठरवणार आहेत. मतदारांच्या सुविधेसाठी राज्यभरात २५,४७१ पेक्षा अधिक मतदान केंद्रे उभारण्यात आली असून, सुमारे १ लाख २८ हजार कर्मचारी या प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत.
आज प्रामुख्याने रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या १२ जिल्ह्यांमध्ये मतदान पार पडत आहे. या निवडणुकांचे मतदान मूळ वेळापत्रकानुसार ५ फेब्रुवारी रोजी होणार होते, परंतु राज्यात पुकारण्यात आलेल्या तीन दिवसांच्या शासकीय दुखवट्यामुळे मतदानाची तारीख दोन दिवसांनी पुढे ढकलण्यात आली होती.
मतदान प्रक्रिया शांततेत आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी सर्व जिल्ह्यांमध्ये कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विशेषतः संवेदनशील मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही आणि अतिरिक्त सुरक्षा दलांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मतदारांना आवाहन केले आहे की, कोणत्याही दबावाला किंवा प्रलोभनाला बळी न पडता निर्भयपणे घराबाहेर पडून मतदान करावे.
निकाल कधी?
आज होणाऱ्या या मतदानाची मतमोजणी सोमवार, ९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजल्यापासून संबंधित जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी सुरू होईल आणि त्याच दिवशी दुपारपर्यंत सर्व निकाल स्पष्ट होण्याची शक्यता आहे. या निकालांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, ग्रामीण भागात कोणत्या पक्षाचे वर्चस्व राहणार, हे लवकरच स्पष्ट होईल.



