खेड: भोस्ते घाट येथे मुंबई-गोवा महामार्गावर मंगळवारी रात्री सुमारे १० वाजता एक भीषण अपघात घडला. मुंबईच्या दिशेने शीतपेयांचे बॉक्स घेऊन जाणाऱ्या कंटेनर ट्रकचा चालकावरील ताबा सुटल्याने वाहन थेट घाटातील संरक्षक भिंतीवर आदळले.
धडक इतकी जबरदस्त होती की संरक्षक भिंत तुटून ट्रकचा पुढील भाग दरीत कोसळण्याच्या स्थितीत हवेत लटकून राहिला. या अपघातात ट्रकच्या केबिनचा पूर्ण चक्काचूर झाला असून, त्यामधील दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
अपघातानंतर महामार्गावरील प्रवासी तसेच स्थानिक मदत गटातील प्रसाद गांधी यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. ट्रक हवेत लटकलेल्या अवस्थेत असल्याने जखमींना बाहेर काढणे अत्यंत धोकादायक होते; मात्र उपस्थितांनी धाडस दाखवत दोघांनाही सुरक्षित बाहेर काढले.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच जगद्गुरु श्री नरेंद्राचार्य महाराज संस्थानची रुग्णवाहिका आणि मदत पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले.
या अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत केली. अपघातग्रस्त कंटेनरमध्ये थम्सअप कंपनीच्या शीतपेयांचा साठा असल्याचे समोर आले आहे.
घाटातील धोकादायक वळणावर चालकाचा अंदाज चुकल्याने हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून, पुढील तपास स्थानिक पोलिसांकडून सुरू आहे. उशिरापर्यंत अपघातग्रस्त वाहन हटवण्याचे काम सुरू होते.



