सातारा – बोगद्याला लागलेल्या गळतीमुळे कोयना जलविद्युत प्रकल्पातील वीज निर्मितीवर मोठा परिणाम झाला आहे. गळतीच्या तांत्रिक अडचणीमुळे प्रकल्पातील काही युनिट्स तात्पुरती बंद ठेवावी लागली असून त्यामुळे एकूण १४९.६२९ दशलक्ष युनिट इतकी वीज निर्मिती घटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
कोयना धरणातून वीज निर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या बोगद्यात अचानक गळती आढळून आल्यानंतर तत्काळ तपासणी व दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. सुरक्षिततेच्या दृष्टीने पाण्याचा प्रवाह नियंत्रित करण्यात आला असून त्यामुळे वीज निर्मिती क्षमतेवर मर्यादा आल्या आहेत. या घटनेचा परिणाम राज्याच्या वीजपुरवठा व्यवस्थेवरही जाणवत असून मागणीच्या तुलनेत उपलब्धता कमी झाली आहे.
संबंधित यंत्रणांकडून गळतीचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू असून लवकरात लवकर दुरुस्ती पूर्ण करून वीज निर्मिती पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तोपर्यंत पर्यायी व्यवस्थेद्वारे वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



