घुणकी: पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील घुणकी येथील ओढ्याच्या पुलावर पहाटेच्या सुमारास कांद्याची वाहतूक करणारा ट्रक उलटल्याने मोठी दुर्घटना घडली. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना ५ किलोमीटरपेक्षा जास्त अंतरापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
कोल्हापूरच्या दिशेने कांदा घेऊन जाणारा हा ट्रक पुलावर आला असता चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या मध्यभागीच उलटला. ट्रक उलटल्यामुळे कांद्याची पोती महामार्गावर विखुरली गेली, परिणामी वाहतूक पूर्णतः थांबली. मुंबई आणि पुण्याहून पहाटेच्या वेळी कोल्हापूरच्या दिशेने येणारे प्रवासी या कोंडीत तासनतास अडकून पडले होते.



