तक्रारदारांनाच नोटिसा! कोलझरमध्ये महसूल विभागाच्या कारभारावर संताप

0
6

दोडामार्ग- तालुक्यातील कोलझर गावात जमिनी खरेदी करणाऱ्या दलाल लॉबीविरोधात आवाज उठवणाऱ्या ग्रामस्थांनाच महसूल विभागाच्या नोटिसांचा सामना करावा लागत आहे. आपल्या मालकीच्या जमिनीत झालेलं अतिक्रमण आणि अवैध उत्खनन याबाबत तक्रार करणाऱ्या तब्बल २६ स्थानिक जमीनमालकांना तहसीलदारांच्या सहीने नोटिसा पाठवण्यात आल्याने गावात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

कोलझर गावातील डोंगराळ भागात अलीकडे काही जमिनींची खरेदी-विक्री झाली. या जमिनींना जाण्यासाठी स्थानिकांना कोणतीही माहिती न देता सुमारे चार किलोमीटर लांबीचं अवैध उत्खनन करण्यात आलं. विशेष म्हणजे हा परिसर इको-सेन्सेटिव्ह झोनमध्ये येतो. तरीही मोठ्या प्रमाणात वृक्षतोड आणि खनिजयुक्त मातीची चोरी झाल्याचे प्रकार उघडकीस आले.

हा प्रकार लक्षात येताच ग्रामस्थांनी एकत्र येत उत्खननाचं काम थांबवलं आणि महसूल विभागाकडे तक्रार केली. पंचनाम्यादरम्यान स्थानिक जमीनमालकांनी स्पष्टपणे सांगितलं की, नव्याने जमीन खरेदी करणाऱ्यांनी त्यांच्या खासगी जमिनीत अतिक्रमण केलं आहे. या संदर्भात व्हिडीओ पुरावेही उपलब्ध असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे.

मात्र, या प्रकरणात दोषींवर कारवाई करण्याऐवजी तक्रार करणाऱ्यांनाच नोटिसा बजावण्यात आल्याने महसूल विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. “ज्यांची जमीन लुटली गेली, त्यांनाच आरोपी ठरवण्याचा हा कोणता न्याय?” असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.

काही दिवसांपूर्वीच कोलझरवासियांनी “गावातील जमीन विकणार नाही” अशी शपथ ग्रामदैवतासमोर घेतली होती. या भूमिकेचं राज्यभरात कौतुक झालं होतं. मात्र आता प्रशासन दलाल लॉबीच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.

प्रशासन कितीही दबाव आणो किंवा नोटिसा पाठवो, आम्ही आमच्या जमिनी आणि पर्यावरण वाचवण्यासाठी मागे हटणार नाही, असा ठाम निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. अवैध उत्खनन आणि वृक्षतोडीचे पुरावे असतानाही खरे दोषी वाचवले जात आहेत का, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here