धार्मिक-सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या तीर्थक्षेत्र जेजुरीतील जयाद्री खोऱ्यातील पेशवेकालीन प्राचीन भूगर्भातील बल्लाळेश्वर शिवालयात पहिल्या सोमवारी हरिद्रचूर्ण चा अभिषेक करणायत आला तटबंदीच्या भूगर्भातील नितांत सुंदर अशा शिवलिंगाच्या दर्शना करिता भर पावसात भाविक आले होते
जेजुरी नगरीच्या दक्षिण-पूर्व बाजूस ऐतहासिक जयाद्री डोंगररांगाच्या कुशीत हे मंदिर दडले आहे. या ठिकाणी दुसरे बाजीराव पेशवे यांनी विस्तीर्ण अशा तलावाची निर्मिती केली असून; या भव्य दगडी तलावाच्या तटात सुमारे शंभर ते सव्वाशे फूट खोल भूगर्भात रेखीव दगडी कोनाडयात शिवपिंडीचे दर्शन घडते. सुमारे ३६ एकर परिसरात बांधलेल्या पेशवेकालीन तलावाच्या बांधकामा प्रसंगी हे शिवलिंग सापडले होते असे सांगितले जाते. सुमारे तीनशे वर्षाचा इतिहास या मंदिराला लाभला आहे.
तलावातील पाण्याचा शेती व अन्य वापराकरता उपयोग व्हावा, याकरता मुख्य सभा मंडपाच्या शिवलिंगाच्या मागील बाजूस तत्कालीन भूमिगत दगडी जलवाहिन्या आहेत. यात पाणी व्यवस्थापनाचे कौशल्य दिसते. काहीसे गोमुख तर काही पुष्करणीसारखी रचना येथील दगडी कामात आहे. यावरून त्या वेळची समग्र स्थापत्य कला पुढारलेली होती, हे स्पष्ट होते, अशी माहिती येथील जाणकार दशरथ जगताप यांनी दिली.
हे शिवालय बाजूस असल्याने विकासापासून दूर राहिले आहे. जुनी जेजुरी येथील काही युवकांनी एकत्र येऊन काही वर्षापासून ‘बल्लाळेश्वर विकास प्रतिष्ठान’तर्फे धार्मिक, आध्यात्मिक व सामाजिक असे विविध उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे. या परिसराला पर्यावरण व ऐतिहासिक महत्त्व असल्याने या परिसरात सोयीसुविधा देण्याकरता सरकारला साकडे घालणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक एन. डी. जगताप यांनी दिली.



