चक्रीवादळ येऊन गेलं खर मात्र या वादळाने सिंधुदुर्ग मधील देवबाग ख्रिश्चनवाडीतील लोकांच्या जगण्या मरणाचे प्रश्न कायम

0
337

सिंधुदुर्ग – चक्रीवादळ येऊन गेलं खर मात्र या वादळाने लोकांच्या जगण्या मरणाचे प्रश्न निर्माण केले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या देवबाग ख्रिश्चनवाडीला या वादळाचा मोठा फटका बसला आहे. वादळ तर गेले आता येणाऱ्या पावसाळ्यात दिवस कसे काढायचे असा प्रश्न येथील रहिवाशांसमोर निर्माण झाला आहे. कारण येथील वस्तीला समुद्राच्या लाटांपासून सुरक्षा देणारा बंधारा वादळातील जोरदार लाटांच्या तडाख्याने उद्धवस्थ झाला आहे. त्यामुळे लाटांचा तडाख्यात हि लोकवस्ती आली आहे. पावसाळ्यात कधीही इथली लोकवस्ती समुद्र गिळंकृत करू शकतो अशी स्थिती आहे.

समुद्राच्या लाटा आता थेट लोकवस्तीत घुसतील

सिंधुदुर्गातील देवबाग हे गाव जेवढे सुंदर तेवढेच आपत्तीच्या काळात अत्यंत धोकादायक असे आहे. एका बाजूला समुद्र आणि दुसऱ्या बाजूला खाडी अशा भौगोलिक स्थितीत असलेल्या या गावाला पावसाळ्यातील काळ हा नेहमीच मृत्यूची टांगती तलवार लटकवलेला असतो. नुकतेच चक्रीवादळ झाले तेव्हा या वादळात येथील समुद्र किनारचा दगडांचा सुरक्षा बंधारा पूर्णपणे उध्वस्थ झाला आहे. येथील ख्रिश्चनवाडीच्या लोकवस्तीपासून ५० मीटर अंतरावर समुद्र किनारी दगडांचा सुरक्षा बंधारा घालण्यात आला होता. हा बंधारा तौक्ते चक्रीवादळात उद्धवस्थ झाला असून बंधाऱ्याचे दगड थेट लोकवस्तीत आले आहेत. त्यामुळे समुद्राच्या लाटा आताच्या पावसाळ्यात थेट लोकवस्थित घुसणार आहेत. सध्या समुद्र लोकवस्तीत आल्याचे चित्र आहे. येथील किनाऱ्याची काही घरे देखील सध्या कोसळलेल्या अवस्थेत आहेत.

चक्रीवादळातील परिस्थिती मन हेलावून टाकणारी

येथील स्थानिक नागरिक फेलिक्स फर्नांडिस सांगतात, चक्रीवादळ किनाऱ्यावर दाखल झाल्यानंतर इथली परिस्थिती अत्यंत भयानक स्तिती होती. मन हेलावून टाकणारी आणि वेदनादायक स्थिती होती. यावेळी समुद्राच्या लाटा रस्त्यापर्यंत गेल्या होत्या. जीव मुठीत घेऊन आम्ही आमच्या घरात होतो. मात्र वादळ जस वाढत गेलं तसे जीव वाचविण्यासाठी आम्ही इथून पळून गेलो. इथल्या प्रत्येक घरात पाणी घुसलं होत. आमच्या ६० ते ७० वयाच्या आणि लहान मुलांना वाचविण्याचा आम्ही प्रयत्न केला, असं ते म्हणाले.

बंधारा उद्धवस्थ झाल्याने लोकवस्तीला धोका

येथील स्थानिक रहिवासी फ्रान्सिस फर्नांडिस सांगतात, अनेक लोक येतात या ठिकाणी पाहणी करून जातात. परंतु राजकारण वैगरे न करता सर्वानी इथल्या समाजासाठी एकत्र येऊन इथला बंधारा केला पाहिजे. हीच इथली मूळ समस्या आहे आणि ती पूर्ण करणे अत्यंत गरजेचे आहे. आता चक्रीवादळ येऊन गेल्यानंतर हि परिस्थिती आहे. आता मान्सून येणार आहे त्यावेळी काय परिस्थिती होईल पहा. अजूनपर्यंत इथे एक दगडही कोणी टाकलेला नाही. कोणी ५ ते १० डम्पर दगड दिलेले नाहीत. आज या बंधाऱ्याला पुन्हा उभा करण्याची गरज आहे. ती जर सुरवात झाली नाही तर आमचं काही सुरवात झालेली नाही. जर अशीच परिस्थिती राहिली तर आम्हाला कायमच कुठेतरी घेऊन जावं लागेल. आम्ही कशी पंढरपूर गाठू असेही ते उद्वेगाने म्हणाले.

आठ दिवस उलटून गेले अजूनही पाणी नाही कि वीज नाही

येथील सामाजिक कामात नेहमीच अग्रेसर असलेले डिसोझा कॅलिस हे युवा कार्यकर्ते सांगतात, चक्रीवादळ येऊन ८ दिवस झालेत अजूनही आमची कोणी दखल घेतलेली नाही. या ठिकाणी लोकांची घरे कोसळली आहेत. अनेकांच्या घरांचे पत्रे उडून गेले आहेत. इथल्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरींमध्ये समुद्राचे खरे पाणी गेले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या इथल्या लोकांची निर्माण झाली आहे. अजूनही इथे वीज आलेली नाही. पावसात इथल्या घरांमधील जीवनावश्यक वस्तू भिजून खराब झालेल्या आहेत. इथला सुरक्षा बंधारा ५० मीटर आत गावात शिरलेला आहे. त्यामुळे समुद्राचे पाणीही गावात शिरत आहे. पावसाळ्यात हि भीती आणखीन वाढलेली आहे. असेही ते म्हणाले.

समुद्राच्या धोक्याची टांगती तलवार येथील लोकांच्या डोकीवर कायम

दरम्यान वादळ येतात आणि वादळ जातात. त्यानंतर इथल्या लोकांना आणि नुकसानीच्या पाहणीसाठी अनेकांचे दौरे होतात. मात्र इथल्या लोकांच्या हातात आजही ठोस असं काही पडलेलं नाही. लोकांचा आक्रोश आजही कायम आहे. या भागात समुद्राच्या धोक्याची टांगती तलवार येथील लोकांच्या डोकीवर सतत लटकत असते. वादळानंतर आणि पावसाळा जवळ आला कि येथील संरक्षण बंधाऱ्याची चर्चा होते. पावसाळ्यानंतर पावसाच्या परतणाऱ्या सरीबरोबर हि चर्चादेखील पुढच्या पावसाळ्यापर्यंत थंड होते. येथील लोकांना आणि त्यांच्या वस्तीला वाचवायचं असेल तर या लोकांना जीवनावश्यक वस्तूंच्या मदतीपेक्षा येतेल समुद्र किनारी पक्का बंधारा उभारण्याची गरज आहे. अन्यथा एक दिवस येथील समुद्र लोकवस्ती गिळंकृत करण्याची भीती येथील लोकांमध्ये आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here