सिंधुदुर्ग – जिल्ह्यातील मालवण मधल्या स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय व रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाने नारळाच्या करवंटय़ांपासून राख्या बनविल्या आहेत.
राखी पौर्णिमा उत्सवात झाडांना राख्या बांधण्याची वृत्ते कानी पडतात पण त्या कचऱयाच्या स्वरुपात निसर्गावर आघात करतात. राख्यांमध्ये वापरण्यात येणारं प्लास्टिक व तत्सम घटकांना पर्याय म्हणून करवंटय़ांचा वापर करण्यात आला. नारळाच्या करवंटय़ांपासून बनविलेल्या राख्या या वेगवेगळय़ा आकाराच्या असून राख्यांवर समुद्र, वारली पेंटिंग, जैवविविधता, मालवणी संदेश याद्वारे निसर्ग व आपली संस्कृतीची झलक दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. विशेष म्हणजे काही राख्यांमध्ये वेगवेगळय़ा प्रकारच्या बिया जोडण्यात आल्या आहेत. रक्षाबंधन उत्सव झाल्यावर राखी मातीत घातल्यास त्यातून रोप येईल. स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे उपक्रमशील प्रा. हसन खान यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.



