कोकण – अरबी समुद्रात उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड आणि वादळी वाऱ्यांची लहर तीव्र झाल्याने सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यासह पश्चिम किनारपट्टीवरील मच्छीमार अडचणीत सापडले आहेत. समुद्रातील तापमानात झालेल्या अचानक बदलामुळे खोल समुद्रात मासळीचा दुष्काळ निर्माण झाला असून सुमारे ३०० हून अधिक मासेमारी बोटी मासळीविनाच किनाऱ्यावर परतल्या आहेत. याचा थेट परिणाम हजारो मच्छीमार कुटुंबांच्या उपजीविकेवर झाला आहे.
सध्या उरणजवळील करंजा बंदरात सुमारे ३०० बोटी नांगरून उभ्या असून मासेमारी पूर्णपणे ठप्प झाली आहे. खोल समुद्रात सहा दिवसांच्या मासेमारीसाठी एका बोटीला मोठा आर्थिक खर्च करावा लागतो. केवळ डिझेलसाठी सुमारे तीन लाख रुपये खर्च होतो. त्यात बर्फ, पाणी, रेशन व १७ कर्मचाऱ्यांचा खर्च धरल्यास एकूण खर्च साडेतीन लाख रुपयांच्या पुढे जातो. मात्र एवढा खर्च करूनही मासळी मिळत नसल्याने मच्छीमार हताश झाले आहेत.
काही मच्छीमारांनी सुरुवातीच्या सहा दिवसांत अपेक्षित मासळी न मिळाल्याने आणखी सहा दिवस समुद्रात राहण्याचा निर्णय घेतला. मात्र सलग बारा दिवसांच्या प्रयत्नांनंतरही मासळीचे प्रमाण अत्यंत कमी राहिले. डिझेल आणि रेशन संपत आल्याने अखेर अनेक बोटी मासळीविनाच परतल्या. ज्यांना थोडीफार मासळी मिळाली, त्यांचे उत्पन्नही झालेल्या खर्चाच्या तुलनेत नगण्य असल्याचे मच्छीमार सांगतात.
या परिस्थितीचा फटका केवळ मच्छीमारांनाच नाही, तर बाजारातील महिला मासळी विक्रेत्यांनाही बसला आहे. मासळीची आवक मोठ्या प्रमाणात घटल्याने बाजारात विक्रीसाठी मालच उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. “मासळीच येत नसेल तर विक्री कशी करायची?” असा सवाल उरणमधील महिला विक्रेत्या उपस्थित करत असून त्यांच्या दैनंदिन उत्पन्नावर गंभीर परिणाम झाला आहे.
पर्ससीन नेट फिशिंग संघटनेचे पश्चिम किनारपट्टीचे प्रतिनिधी रमेश नाखवा यांनी सांगितले की, अरबी समुद्रातील शीतलहरींमुळे खोल समुद्रातील पाण्याचे तापमान बदलले आहे. त्यामुळे मासळी किनाऱ्याच्या दिशेने येत नसून सध्या मत्स्यदुष्काळासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. खर्चही वसूल न झाल्याने मच्छीमारांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून शासनाने तातडीने मदतीची भूमिका घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
अर्थव्यवस्थेला बसणार मोठा फटका
कोकण किनारपट्टीवरील मासेमारी व्यवसायावर थेट व अप्रत्यक्षपणे सुमारे ८ ते १० लाख मच्छीमार बांधव व कुटुंबीय अवलंबून असल्याचा अंदाज आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे व पालघर जिल्ह्यांतील मच्छीमार, खलाशी, महिला मासळी विक्रेते, प्रक्रिया उद्योग, बर्फ कारखाने व वाहतूक व्यवसाय या साखळीत मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होतो. या क्षेत्रातून दरवर्षी १५ ते २० हजार कोटी रुपयांपर्यंत आर्थिक उलाढाल होत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे मासेमारीवर येणारा कोणताही संकटाचा परिणाम केवळ मच्छीमारांपुरता मर्यादित न राहता संपूर्ण कोकणच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला हादरा देणारा ठरतो.



