कोकणातील या गावात परप्रांतीयांना जमीन खरेदी करण्यास सक्तमनाई.

0
202

सिंधुदुर्ग – वाडवडिलांची स्थावर मालमत्ता विकुन स्वत: भुमीहिन होणारा माणुस फक्त कोकणात सापडतो अशी कायम बोलणी खायला लागणाऱ्या कोकणीमाणसाने आता आओअल्यात बदल करायला सुरुवात केली आहे . रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील एका छोट्याशा गावाने याची सुरुवात केली असुन यापुढे आपल्या जमीनी परप्रांतियाना न विकण्याचा निर्णय घेतला आहे . आता हे लोण हळुहळु सर्व कोकणभर पसरणार आहे . त्यामुळे कोकणी माणसा ! शाब्बास ! तुझे अभिनंदन !

परप्रांतीय कोकणात येऊन कवडीमोल दराने जमिनी खरेदी करून त्यावर आपले इमले उभारत आहेत . तर बहुतांशी परप्रांतिय किकणात एखाद्या प्रकल्पाची चाहुल लागली कि त्या त्या ठिकाणी जमिनी खरेदी करुन करोडो रुपये कमावत असतात . तर कोकणी माणुस एजंटांच्या क्षणिक आमिषाला बळी पडून आपल्या वाडवडीलांनी जपलेल्या जमिनी परप्रांतीयांच्या हवाली करून स्वत: भूमिहिन होत आहे. परप्रांतीयांचा कोकणातील जमिनीवर डोळा आहे. अशावेळी कोकणी माणूसही जागा होऊ लागला आहे. याची पहिली सुरूवात रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातून झाली आहे. दापोली तालुक्यातील ओळगाव मधील ग्रामस्थांनी एकत्र येत कुणीही गावाबाहेरील व्यक्तीला जमीन विकायची नाही असा निर्णय घेतला असून बाहेरील व्यक्तींना जमीन खरेदी करण्यास सक्त मनाई अशा आशयाचे फलक गावात उभारून जनजागृती करण्यात आली आहे.

कोकणात परप्रांतीय मोठ्या संख्येने जमिनी खरेदी करत आहेत. कोकणाला लाभलेला समुद्रकिनारा आणि निसर्गसौंदर्यामुळे परप्रांतीयाचा कोकणातील जमिनीवर डोळा आहे. दलालांच्या माध्यमातून कोकणातील जमिनी घशात घालण्याचे डाव आखले गेले आहेत. नाणार असो किंवा बारसू यापरिसरात परप्रांतीयांनी मोठ्या प्रमाणात जमिनी खरेदी केलेल्या आहेत. त्याशिवाय रत्नागिरी जिल्ह्यातील अन्य गावागावातील जमिनीची खरेदी परप्रांतीय तसेच बाहेरील मंडळींनी केलेली आहे. पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचा तालुका असलेल्या दापोलीतही मोठ्या प्रमाणात जमिनी खरेदी झालेल्या आहेत. परप्रांतीय मंडळींनी कोकणातील जमिनीची किंमत आणि महत्व ओळखल्याने ते दलालांच्या माध्यमातून जमिनी खरेदी करत आहेत.

आपल्या वडीलोपार्जित जमिनी कवडीमोल भावाने खरेदी केल्या जात असल्याची जाणीव आता कोकणी माणसाला झाली असून त्याची सुरूवात दापोलीतील छोट्याशा ओळगावातून झाली आहे. ओळगावातील एक जमिन बाहेरील व्यक्तीने खरेदी केल्याची कुणकुण गावकऱ्यांना लागताच गावकरी एकवटले आणि त्यांनी यापुढे गावातील जमिन परप्रांतीयांना तसेच गावाबाहेरील व्यक्तीला विकायची नाही असा कठोर निर्णय घेतला. त्या आशयाचे गावकऱ्यांनी फलकही गावात लावले आहेत. त्या फलकावर ठळक अक्षरात असे लिहिण्यात आले आहे की “ओळगाव मधील जमीन बाहेरील व्यक्तीला खरेदी करण्यास सक्त मनाई आहे”. हे फलक गावकऱ्यांनीच गावात लावले असल्याने कोकणाला जमिनीचे महत्व कळले असून गावकरी जागे झाल्याची चर्चा रंगली आहे. ओळगावातील ग्रामस्थ मंडळाने एकत्र येत हा कठोर निर्णय घेतला आहे.

स्थानिक ग्रामस्थांच्या जमिनी बाहेरील मंडळी विकत घेतात आणि जागेला कुंपण घालतात अशावेळी अन्य गावकऱ्यांचा रस्ता बंद होतो. अशाप्रकारच्या अनेक घटना घडून गावचे गावपण निघून जाऊन सामाजिक संतुलनही बिघडते. अनेकवेळा दलालांच्या अमिषाला बळी पडून गावकरी जमीन कवडीमोलाने विकतात आणि फसतात. अशा घटना घडू नयेत म्हणून गावकरी एकवटले आहेत.

१५२ कुटुंबाच्या छोट्याशा गावचा आदर्श

बाहेरील व्यक्तीला गावातील जमीन खरेदी करण्यास सक्त मनाई करण्याचा ओळगावाने महत्वपूर्ण निर्णय घेतला.१५२ कुटुंब असलेल्या छोट्याशा ओळगावाने घेतलेला निर्णय”ओळ” अधोरेखित करण्यासारखा निर्णय असून इतर गावांनी त्याचा आदर्श घेऊन आपल्या जमिनी विकू नयेत अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here