येत्या १९ ते २१ डिसेंबर २०२५ या तीन दिवशी होणाऱ्या २५ व्या रौप्य महोत्सवी लोकोत्सवाच्या उद्घाटनाचे आमंत्रण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना देण्यात आले. गोव्याचे क्रीडा व युवा व्यवहार, आदिवासी कल्याण तथा कला वा संस्कृती मंत्री डाॕ. रमेश तवडकर यांनी नवी दिल्ली येथे राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींची भेट घेऊन त्यांना हे आमंत्रण दिले. यावेळी त्यांच्या सोबत केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर हे उपस्थित होते.
२००० सालापासून दरवर्षी काणकोण येथे आदर्श युवा संघातर्फे आयोजित केला जाणारा लोकोत्सव आता राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेचा विषय बनला आहे. कला, संस्कृती, क्रीडा, लोककला, निसर्गोपचार, आयुर्वेद, आदिवासी परंपरेचा वारसा अशा वैविध्यपूर्ण गोमंतकीय वैशिष्टयांनी युक्त असलेल्या लोकोत्सवाचे यंदा रौप्य महोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्त या लोकोत्सवाचे आधारस्तंभ तथा कला व संस्कृती मंत्री डाॕ. रमेश तवडकर यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना उद्घाटनासाठी उपस्थित राहण्याची विनंती केली आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत मंत्री डाॕ. रमेश तवडकर व राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची सुमारे अर्धा तास चर्चा झाली. काणकोण लोकोत्सवातील गेल्या २४ वर्षांत आयोजित करण्यात येत असलेले विविध सांस्कृतिक तथा रोजगार निर्मितीचे कार्यक्रम, श्रमधाम या बहुचर्चित योजनेच्या माध्यमातून गोवा राज्यातील तसेच इतर राज्यातही गरीब गरजूंना घरे बांधून देण्याचा बहुचर्चित उपक्रम तसेच बलराम शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण गोव्यातील शैक्षणिक क्षेत्रात राबविण्यात येत असलेल्या यशस्वी प्रयोगांची माहिती मंत्री डाॕ. रमेश तवडकर यांनी यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना दिली.
६४ व्या गोवा मुक्ती दिनाच्या दिवशी सुरू होणाऱ्या यंदाच्या लोकोत्सवाचे हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. देशाच्या विविध राज्यातील आदिवासी तथा लोककलाकार या लोकोत्सवात दरवर्षी नियमित हजेरी लावून आपली कला- कौशल्ये सादर करत असतात. आशियातील तसेच युरोपातील काही देशातील सांस्कृतिक कलाकार यंदाच्या लोकोत्सवाला उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या लोकोत्सवाला उपस्थित राहण्याचा जरूर प्रयत्न करेन, असे आश्वासन दिले आहे.
कॅप्शन
नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना काणकोण लोकोत्सवाचे आमंत्रण देताना गोव्याचे कला व संस्कृती मंत्री डाॕ. रमेश तवडकर. सोबत केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर.



