कांग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या विधानाने महाराष्ट्रात नवा वाद, टिपू सुलतानांविषयीच्या वक्तव्यावरून राजकारण तापले

0
11

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान यांच्या संदर्भातील वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले आहे. मालेगाव महानगरपालिकेतील उपमहापौरांच्या दालनात लावण्यात आलेल्या टिपू सुलतान यांच्या छायाचित्रावरून आधीच वाद निर्माण झाला असताना सपकाळ यांच्या विधानाने राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बुलढाणा येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सपकाळ यांनी म्हटले की, ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज यांनी शौर्य आणि स्वराज्याचा विचार देशाला दिला, त्याच परंपरेत पुढील काळात टिपू सुलतान यांनी इंग्रजांविरोधात लढा उभारला. त्यामुळे शौर्याचे प्रतीक म्हणून त्यांना शिवाजी महाराजांच्या समकक्ष पाहिले पाहिजे. टिपू सुलतान हे भारतभूमीचे सुपुत्र होते आणि त्यांनी कोणत्याही विषारी किंवा विखारी विचारांना जवळ केले नाही, असेही त्यांनी नमूद केले.

या विधानावर भाजप नेत्यांनी तीव्र टीका केली आहे. दरम्यान, सपकाळ यांनी राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवरही भाष्य करताना सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. नरहरी झिरवाळ प्रकरणाचा उल्लेख करत त्यांनी संपूर्ण सरकारच लाचखोर असल्याचा आरोप केला. कोट्यवधी रुपयांच्या कथित गैरव्यवहारांबाबत कारवाई का होत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

कांग्रेस मध्ये संघटनात्मक पुनर्बांधणीची गरज व्यक्त करताना १७ आणि १८ फेब्रुवारी रोजी पक्षाची दोन दिवसीय बैठक होणार असून आगामी वाटचालीवर चर्चा केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्र सरकारवर टीका करताना त्यांनी अमेरिकेसोबतच्या करारामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार नसल्याचा दावा केला. तसेच महाविकास आघाडीत लवकर संवाद होण्याची गरज व्यक्त करत भाजपाविरोधात एकत्रित भूमिका घेण्याचे संकेत दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here