सिंधुदुर्ग – तब्बल चाळीस वर्षाच्या प्रर्दीघ कालावधीत 21 दिवसांचा गणेश उत्सव साजरा होणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीचा राजा गणपती उत्सव यंदा अवघे पाच दिवस साजरा होणार आहे. कोरोना साथरोगामुळे रिक्षा व्यवसायातील आर्थिक मंदीत कोणताही मोठा उत्सव किंवा सामाजिक उपक्रम न राबवता साधेपणाने सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय या मंडळाने घेतला आहे. साधारण 1981 -82 या वर्षामध्ये रिक्षा चालक मालक संघटनेच्या मंडळींनी या गणपतीची स्थापना केली. यावर्षी २१ दिवसाच्या परंपरेला कोरोनामुळे पहिल्यांदाच फाटा दिला जाणार आहे.
कणकवली शहर आणि परिसरातील रिक्षा चालक – मालक गणेश उत्सव कला क्रीडा मंडळ स्थापन झाले आणि साधारण 1981 -82 या आर्थिक वर्षामध्ये विविध उपक्रम सुरू झाले. त्याच वर्षी मंडळाच्या माध्यमातून शहरातील मुंबई – गोवा महामार्गालगत पेट्रोल पंपाच्या बाजूला मोकळ्या जागेत गणेश मूर्तीचे प्रतिष्ठापना होऊ लागली. छोटेखानी मंडप त्याकाळी होता; पण परिस्थिती बदलत गेली तशी मंडळाची आर्थिक स्थितीही बदलत गेली. शहर आणि परिसरात रिक्षांची संख्या वाढली.
या मंडळाला हातभार लावणाऱ्या रिक्षाचालक – मालक सभासदांची संख्या वाढली. त्यामुळे रिक्षा चालक मालक संघटनेच्या हा सार्वजनिक स्वरूपातील तालुक्यातला पहिला सार्वजनिक गणेश उत्सव होता. जिल्ह्यातील सुप्रसिध्द भजनी बुवांची मोठी डबलबारी भजन सामना अशी ख्याती या मंडळाची होती. गणेश उत्सव एकवीस दिवस साजरा करत असताना विविध सामाजिक उपक्रम राबवणे, समाज प्रबोधनाचे अनेक देखावे या मंडळाने उभे केले. याला भाविकांकडून उत्तम असा प्रतिसादही मिळत होता. मंडळाकडे स्वतःची अशी जागा नसल्याने महामार्गालगत मंडप उभारून गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना सुरू झाली होती.
अलीकडच्या काही वर्षात कणकवलीचा राजा अशी ख्याती या सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाची होती. दोन वर्षापासून राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण सुरू झाले आणि मंडळाकडे असलेली जागा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी संपादित झाली. त्यामुळे गेल्या वर्षी केवळ 17 दिवस उत्सव साजरा झाला. यंदा मात्र संपूर्ण जगालाच कोरोनाच्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे.
ही स्थिती याही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळावर ओढावली आहे. गेल्या चार-साडेचार महिन्यात रिक्षा व्यवसाय ठप्प असल्याने आर्थिक पाठबळ उभारायचे कसे असा प्रश्न आहे. त्यामुळे राज्य शासनाचे नियम लक्षात घेऊन, यंदा पाच दिवस गणेश उत्सव साजरा करणार केला जाणार असून कोणतेही उपक्रम साजरे होणार नाहीत, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष बाळा वराडकर यांनी दिली आहे. या मंडळाच्या उपाध्यक्षपदी अरुण परब, सचिवपदी भाई परब, खजिनदारपदी प्रभाकर कोरगावकर, अण्णा कोदे आदी कार्यरत आहेत.



