एक हजार फुट खोल दरीतून आठशे किलोची तोफ नेली गडावर मावळा प्रतिष्ठानने रचला आणखी एक नवा इतिहास

0
115

सिंधुदुर्ग – जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातल्या सोनगड किल्यावरून खाली पाहिल्यावर अंगाचा थरकाप उडवणाऱ्या एक हजार फुट खोल दरीतून अंदाजे आठशे किलोची तोफ गडावर घेऊन जात कोल्हापूरच्या मावळ प्रतिष्ठानने नवा इतिहास रचला आहे. मावळ प्रतिष्ठानच्या मावळ्यांना अफाट मेहनतीने ही तोफ गडावर नेली. अत्यंत चित्तथरारक आणि इतिहास प्रेमींना नवी ऊर्जा देणारे हे काम असल्याचा अनुभव या कामाची क्षणचित्रे पाहिल्यावर येतो.

 

इंग्रजांनी १५० वर्षांपूर्वी ढकलून दिली होती ही तोफ

 

मावळा प्रतिष्ठान कोल्हापूर च्या निष्ठावंत मावळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेमापोटी रांगणा तोफ मोहीम फत्ते केल्यानंतर अतिशय कठीण अशी समजली जाणारी किल्ले सोनगड येथील मोहोमही यशस्वी केली आहे. इंग्रजांनी १५० वर्षांपूर्वी ढकलून दिलेली एक हजार फूट खोल दरीतून आठशे किलो ची तोफ किल्ल्यावर नेण्यात या मावळ्यांनी यश मिळवले आहे. थरारक असा समजला जाणारा सोनगड किल्याच्या कड्या कपारीतून तोफ गडावर विराजमान करण्यात आली. सोनगड तोफ मोहिमेसाठी पन्नास हून अधिक मावळ्यांनि सलग तीन दिवसाच्या करो या मरो कालावधी मध्ये ही मोहीम पार पाडली. सदर तोफ मोहिमेसाठी संघर्ष ग्रुप खानापूर आणि शिवाज्ञा ग्रुप यांचा फार मोलाचा सहभाग लाभला.

 

रांगणा नंतर सोनगडावर मोहीम फत्ते

 

मावळा प्रतिष्ठान ने मागील मोहीम रांगणा किल्ल्यावर घेतलेली होती. रांगणा किल्ल्याच्या अंदाजे अठराशे फूट खोल दरीतून १००० किलो ची तोफ गडावरती घेऊन इतिहास रचला होता. त्याचप्रमाणे प्रतिष्ठानच्या मावळ्यांनी सोनगड किल्ल्याच्या दरीमध्ये कोसळलेली एक तोफ गडावर घेऊन आणखी एक शिवकार्य पदरी पाडले. सदर किल्यावरती पाण्याचा कोणताही स्त्रोत नसताना मावळ्यांनी मोहीम फत्ते केली आहे.

 

वनरक्षकाने पहिली होती ही तोफ

 

गारगोटीचे वनरक्षक किरण पाटील यांनी सोनगडच्या दरीत तोफ असल्याची माहिती कांतिभाई पटेल व प्रवीण तावडे यांना दिली. या दोन मावळ्यांनी २४ एप्रिलला या गडाच्या दरीत उतरून अथक्‌ प्रयत्नांनी या तोफेचा शोध घेतला. दरीमधून तोफ बाहेर काढण्यासाठी जागेची पाहणी केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात वसलेला एक दुर्लक्षित किल्ला म्हणजे किल्ले सोनगड. समुद्रसपाटीपासून ३५० मीटर उंचीवर वसलेला हा किल्ला, याच्या माथ्याकडील कातळटोपीमुळे आपले लक्ष वेधून घेतो. या गडाच्या दरीत सुमारे १००० फुटांवर किर्र जंगलात अनेक वर्षांपासून पडून असलेली ही एक तोफ होती. अखेर ती गडावर आणण्यात यश आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here