मालवण- तालुक्यातील मसूरे–आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी मातेचा वार्षिक जत्रोत्सव आणि जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची मतमोजणी एकाच दिवशी, म्हणजे ९ फेब्रुवारी रोजी होत असल्याने सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनासमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. कोकणची दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या ठिकाणी दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. त्याच दिवशी मतमोजणीही होणार असल्याने कायदा व सुव्यवस्था आणि वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण येण्याची शक्यता आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला होता. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार निवडणुकीच्या कार्यक्रमात बदल करण्यात आला आहे. याआधी ५ फेब्रुवारीला मतदान आणि ७ फेब्रुवारीला मतमोजणी होणार होती. आता मतदान ७ फेब्रुवारीला तर मतमोजणी ९ फेब्रुवारीला होणार आहे.
९ फेब्रुवारीला होणाऱ्या आंगणेवाडी जत्रेसाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक सिंधुदुर्गात दाखल होतात. याच दिवशी मतमोजणी केंद्रांवर उमेदवार, कार्यकर्ते आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार असून, जत्रोत्सव आणि मतमोजणीसाठी स्वतंत्र सुरक्षा व्यवस्था उभारण्यात येणार आहे.
भाविकांच्या वाहनांमुळे आणि निवडणूक कामासाठी येणाऱ्या वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विशेष ट्रॅफिक प्लॅन तयार केला जाणार आहे. नागरिकांनी विनाकारण गर्दी करू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आणि पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी केले आहे.
लोकशाहीचा उत्सव आणि श्रद्धेचा महोत्सव एकाच दिवशी येत असल्याने नागरिकांनी संयम आणि शिस्त राखून प्रशासनाला सहकार्य करावे, जेणेकरून दोन्ही कार्यक्रम शांततेत पार पडतील, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.



