आमदारांच्या अभ्यासदौऱ्यांसाठी आता आचारसंहिता; विधिमंडळाची विशेष समिती गठीत

0
22

मुंबई: आमदारांनी अभ्यासदौऱ्यांदरम्यान कसे वागावे आणि त्यांचे सार्वजनिक जीवनातील आचरण कसे असावे, यासाठी नियमावली निश्चित करण्याकरिता महाराष्ट्र विधिमंडळाची नऊ सदस्यीय विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. अनेकदा विविध विषयांच्या अभ्यासासाठी आमदारांचे राज्यभरात आणि राज्याबाहेर दौरे आयोजित केले जातात. या दौऱ्यांदरम्यान लोकप्रतिनिधींच्या वर्तणुकीबाबत आणि शिष्टाचाराबाबत स्पष्ट नियम असावेत, या हेतूने ही समिती महत्त्वपूर्ण निर्णय घेणार आहे.

भाजपचे ज्येष्ठ आमदार चैनसुख संचेती यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करणार असून, यामध्ये भाजप, शिवसेना, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशा सर्व प्रमुख पक्षांच्या प्रतिनिधींचा समावेश करण्यात आला आहे. या विशेष समितीमध्ये सावंतवाडीचे आमदार आणि राज्याचे माजी मंत्री दीपक केसरकर यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्या अनुभवाचा समितीला मोठा फायदा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या विशेष शिफारशीवरून केसरकर यांची या पदावर निवड करण्यात आली आहे.

दीपक केसरकर हे त्यांच्या सुसंस्कृत आणि शांत स्वभावासाठी ओळखले जातात. शिवसेना फुटीच्या काळात शिंदे गटाची बाजू प्रवक्ते म्हणून त्यांनी अत्यंत संयमीपणे मांडली होती, ज्याची दखल घेत त्यांची या अभ्यासू समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीत त्यांच्यासोबतच सिंधुदुर्ग जिल्ह्यातून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सुनील प्रभू, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील आणि रामराजे निंबाळकर यांसारख्या अनुभवी नेत्यांचा समावेश आहे. एकूण नऊ सदस्यांची ही समिती लवकरच आमदारांसाठी नवीन आचारसंहिता आणि मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करणार आहे. दीपक केसरकर यांच्या निवडीमुळे राजकीय आणि सामाजिक स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here