अजित पवार विमान दुर्घटना प्रकरण: व्हीएसआर कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवार आक्रमक, उद्या बारामतीत करणार तक्रार

0
3

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेनंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, आता या प्रकरणात विमान कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. डीजीसीएने संबंधित व्हीएसआर कंपनीची सर्व उड्डाणे तात्पुरती बंद केल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या विमान कंपनीवर एफआयआर दाखल करण्यासाठी रोहित पवार उद्या थेट बारामती तालुका पोलीस ठाण्यात तक्रार देणार असून, आज त्यांनी मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यातही आपली भूमिका ठामपणे मांडली.
गत २८ जानेवारी रोजी मुंबईहून बारामतीकडे येत असताना बारामती विमानतळाच्या धावपट्टीजवळ अजित पवार यांच्या विमानाला भीषण अपघात झाला होता. या दुर्दैवी घटनेत त्यांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण महाराष्ट्र शोकमग्न झाला. मात्र, सुरुवातीपासूनच ही घटना केवळ एक तांत्रिक अपघात आहे की घातपात, याबाबत जनमानसात आणि राजकीय वर्तुळात संभ्रमाचे वातावरण होते. रोहित पवार यांनी या प्रकरणी स्वतंत्रपणे तांत्रिक माहिती गोळा करून तपासाच्या प्रक्रियेवर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. दिल्ली आणि मुंबईतील पत्रकार परिषदांमधून त्यांनी या प्रकरणातील तांत्रिक त्रुटी आणि विसंगती लोकांसमोर आणल्या आहेत.
या प्रकरणाला नवे वळण तेव्हा मिळाले जेव्हा डीजीसीएने संबंधित विमान कंपनीवर कडक कारवाई करत त्यांच्या उड्डाणांवर बंदी घातली. मात्र, केवळ उड्डाणबंदी करून हे प्रकरण मिटणारे नाही, तर यामागील सत्य समोर येण्यासाठी संबंधित कंपनीवर तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करणे आवश्यक असल्याचे रोहित पवार यांचे म्हणणे आहे. दुर्घटना ज्या हद्दीत घडली, त्या बारामती तालुका पोलीस ठाण्यात जाऊन आपण अधिकृत तक्रार देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता पोलीस प्रशासन या तक्रारीची दखल घेऊन काय पावले उचलते आणि तपासाची चक्रं कोणत्या दिशेने फिरतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here