सिंधुदुर्ग – स्वतःच्या स्वार्थासाठी राणेंना जिल्हा बँकेचा कारभार हवा आहे. नारायण राणे जेव्हा काँग्रेसमध्ये होते तेव्हा माझ्यासह तेरा कार्यकर्त्यांच्या नावावर त्यांनी बोलेरो गाडी घेतली होती. त्या गाड्यांच कर्ज आम्ही स्वतः फेडलं आहे. त्या गाड्या आजही त्यांच्या ताब्यात आहेत. ७ गाड्यांचं प्रत्येकी १८ लाख कर्ज अजूनही थकीत आहे. शिवसेनेचे जेष्ठ नेते अण्णा केसरकर यांचेही १७ लाख थकित आहेत. त्यांचेही पैसे अजून भरले गेले नाहीत. या बोलेरो गाड्यांचे १ कोटी ४० लाख रुपये थकीत आहेत आणि हे कर्ज बुडविण्यासाठीच त्यांना ही जिल्हा बँक ताब्यात हवी आहे.
शेतकऱ्यांच्या भल्यासाठी राणेंना बँक नकोय, असा खळबळजनक आरोप महाविकास आघाडीचे जिल्हा बँक निवडणुक पॅनेल प्रमुख सतीश सावंत यांनी केला आहे. तसेच कोणीही कितीही धनशक्तीने दहशत निर्माण करायचा प्रयत्न केला तरी निर्भीडपणे मतदान करायचा निर्णय जिल्हा बँकेच्या ९८१ मतदारांनी केला आहे. त्यामुळे ही जिल्हा बँक निवडणूक महाविकास आघाडीच जिंकेल. असा विश्वास सतीश सावंत यांनी व्यक्त केला आहे.
जिल्हा बँक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या घामातून उभी राहिलेली आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या घामाचं आणि कष्टाचं मोल सहकारी संस्थांना आहे. त्याच प्रतिबिंब उद्याच्या निवडणुकीत दिसेल. ज्या मतदारांना गायब केलं गेलंय ते उद्या त्या मतदारकडून समजेल. कर्ज थकीत असलेल्यांना बँकेत शिरकाव करायला दिला जाणार नाही. गेल्या साडे सहा वर्षांत जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाने केलेल्या कामामुळे बँकेच्या ठेवी तसेच कर्जात वाढ झाली. असेही ते म्हणाले.