सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने 160 दिव्यांग बांधवांना बनवले आत्मनिर्भर सायकल योजना ठरतेय लोकप्रिय

0
116

 

सिंधुदुर्ग – जिल्ह्यातील आणखी 54 दिव्यांग बांधव 2019-20 या आर्थिक वर्षात आत्मनिर्भर बनले आहेत. जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्यावतीने त्यांना स्वयंचलित तीन चाकी, दुचाकी पुरविल्या आहेत. यासाठी जिल्हा परिषदेने स्वनिधीतून 41 लाख 4 हजार एवढा निधी खर्च केला आहे. या योजनेतून जिल्ह्यातील 160 दिव्यांग आतापर्यंत आत्मनिर्भर बनले आहेत.

ज्या बांधवांना 40 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त अपंगत्व आहे; मात्र त्यातील ज्यांच्या हाताला व्यंगत्व नाही, अशा दिव्यांगांसाठी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाने 20 टक्के स्वनिधीतून 2016-17 या आर्थिक वर्षापासून “अस्थिव्यंग स्वयंचलित तीन चाकी सायकल पुरविणे’ ही योजना कार्यान्वित केली आहे. योजना कार्यान्वित केल्यानंतर सलग चौथ्या वर्षी राबविली आहे.

2016-17 ते 2018-19 या तीन वर्षांत 106 दिव्यांग बांधवांना या योजनेचा लाभ दिला होता. यासाठी 77 लाख 72 हजार 622 रुपये एवढा निधी खर्च करण्यात आला होता. पहिल्या वर्षी म्हणजेच 2016-17 मध्ये 40 लाभार्थी, 2017-18 मध्ये 47 लाभार्थी, तर 2018-19 मध्ये 19 लाभार्थी, अशी पहिल्या तीन वर्षांत लाभार्थी संख्या राहिली होती. 2019-20 या चौथ्या वर्षीसुद्धा ही योजना राबविण्यात आली आहे. यावर्षी सर्वांत जास्त 54 लाभार्थी निवडून त्यासाठी 41 लाख 4 हजार एवढा निधी खर्च करण्यात आला आहे.

शासनाने दिव्यांग बांधवांसाठी अनेक योजना आणल्या आहेत. गेल्या काही वर्षांत या बांधवांच्या वैयक्तिक व सामूहिक विकासासाठी निधी राखीव ठेवला जात आहे. यातून कोणत्या योजना राबवाव्यात त्या पण दिल्या आहेत; मात्र यात दिव्यांग बांधवांना स्वयंपूर्ण बनविणारी दुचाकी पुरविणे ही योजना नाही. जिल्हा परिषदेने सुरू केलेल्या या योजनेमुळे जिल्ह्यातील 160 दिव्यांग आतापर्यंत आत्मनिर्भर बनले आहेत. यापुढेही ही योजना अशीच सुरू राहणार आहे. राज्यात अशाप्रकारे योजना राबविणारी एकमेव जिल्हा परिषद आहे. तीन चाकी, दुचाकीची किंमत जास्त असतानाही या बांधवांना परावलंबातून बाहेर काढण्यासाठी माझा समाज कल्याण विभाग काम करीत असल्याचा मला अभिमान आहे, अशी प्रतिक्रिया “सकाळ’शी बोलताना समाज कल्याण सभापती शारदा कांबळे यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here