कर्जमुक्ती शेतकरी योजनेमधून सिंधुदुर्ग जिल्हय़ातील 250 शेतकऱयांची पहिली यादी जिल्हा प्रशासनाने जाहीर केली आहे. हे सर्व शेतकरी वैभववाडी तालुक्यातील लोरे नं.2 आणि वेंगुर्ले तालुक्यातील परुळे गावातील आहेत. आधार प्रमाणीकरण होईल, त्याप्रमाणे टप्प्याटप्प्याने कर्जमुक्त शेतकऱयांची यादी जाहीर केली जाणार आहे.
नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन लाखापर्यंत शेतकरी कर्जमुक्तीची घोषणा केली. त्यानंतर गेले दोन महिने कर्जदार शेतकऱयांची माहिती सहकार विभागाकडून गोळा करून पात्र शेतकऱयांची यादी तयार केली जात होती. त्यानंतर पात्र शेतकऱयांचे आधार प्रमाणीकरण करून कर्जमुक्ती शेतकऱयांची यादी टप्प्याटप्प्याने जाहीर करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिवाळी अधिवेशनच्या शेवटच्या दिवशी कर्ज मुक्तीची घोषणा केल्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कर्जमुक्त शेतकऱयांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये सिंधुदुर्ग जिल्हय़ातील 250 शेतकऱयांचा समावेश आहे.
शासनाने दोन लाखापर्यंत जाहीर केलेल्या कर्जमुक्ती शेतकरी योजनेमध्ये जिल्हय़ातून सुमारे 10 हजार 920 पात्र शेतकऱयांची यादी तयार केली आहे. ज्या पात्र शेतकऱयांचे आधार प्रमाणीकरण झाले आहे, अशा प्रत्येक जिल्हय़ातील दोन गावातील शेतकऱयांची पहिली यादी शासनाने जाहीर केली आहे. सिंधुदुर्गात वैभववाडी तालुक्यातील लोरे नं. 2 या गावातील 109 शेतकरी तर वेंगुर्ले तालुक्यातील परुळे गावातील 141 शेतकऱयांचा समावेश आहे.