सिंधुदुर्गात ‘शॉर्टेज’मुळे चिकनच्या किमती भरमसाठ

0
99

 

सिंधुदुर्ग – कोरोना व्हायरस’च्या प्रादुर्भावाची चर्चा झाली अन् पहिल्या काही दिवसांतच जिल्हय़ातील ‘चिकन’प्रेमींच्या ताटातून कोंबडी गायब झाली. अर्थात कोंबडय़ांमुळे कोरोना होत नसला, तरीही पहिल्या टप्प्यात पसरलेल्या अफवांमुळे चिकन व्यावसायिकही अडचणीत आले. 170 ते 180 रुपये किलो दराने मिळणारी कोंबडी सुरुवातीला 120 पर्यंत आली. नंतर काहींनी ती 50 ते 60 रुपये किलोनेही विकली. त्यामुळे भाव पडण्याच्या भीतीने अनेकांनी पुढील ‘बॅच’ तयार करण्याची रिस्कही घेतली नाही. परिणामी लोकांच्या मनातील कोंबडीमुळे कोरोना होण्याची भीती दूर झाल्याने व मार्केटमध्ये शॉर्टेज असल्याने हीच कोंबडी आता भाव खाऊ लागली आहे. जवळपास अडीच महिन्यांच्या लॉकडाऊननंतर कोंबडीने सुसाट झेप घेतली असून किंमत प्रतिकिलो 80 ते 90 रुपयांनी वाढली आहे. विशेष म्हणजे केंबडी खवय्यांची संख्या वाढलेली नसून बाजारात शॉर्टेज असल्याने या किंमती वाढल्याचे व्यावसायिकांकडून सांगण्यात आले.

भारतात ‘कोरोना’चा प्रादुर्भाव जाणवू लागताच कोरोना कशामुळे होतो, याबाबतच्या अफवा अधिक वेगाने पसरल्या. या अफवेचा पहिला बळी ठरल्या, त्या कोंबडय़ा. अफवेचा परिणाम चिकन विक्रेते, चिकन उत्पादकांना सोसावा लागला. चिकनच्या माध्यमातून ‘कोरोना’ची लागण होत असल्याचे ‘मेसेज’ व्हायरल होताच तज्ञांनी कितीही सांगितले, तरीही लोकांनी केंबडीकडे पाठ फिरविली अन् मार्च महिन्याच्या पहिल्या आठवडय़ापासूनच कोंबडीच्या विक्रीत कमालीची घट झाली. ही घट सुरुवातीच्या टप्प्यात 50 टक्क्यांपर्यंत जाणवली.

धोका ओळखून दर कमी केले

एकिकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व दुसरीकडे बाजारात दर मिळाला नाही, मार्केट पडले तर काय? या भीतीने पोल्ट्री उत्पादकांच्या पोटात गोळा आला. परिणामी अनेकांनी कोंबडय़ांचा रोजचा खाण्याचा व इतर खर्चाचा ताळमेळ घालत, कोंबडी कमी दराने विकण्याचा निर्णय घेतला. काही दिवस 120 रुपयांपर्यंत विकली गेलेली कोंबडी नंतर 50 ते 60 रुपये किलोपर्यंतही विकून टाकण्यात आली. यात कोंबडी उत्पादक, विक्रेत्यांचे नुकसान झाले. पण पुढील संकटाचा विचार करून त्यांनी कोंबडी कमी दरानेच देणे पसंत केले.

ब्रॉयलर कोंबडीचे पिल्लू जन्माला आल्यानंतर पुढील 40 ते 50 दिवसांत त्याची विक्री होणे आवश्यक असते. तसे न झाल्यास त्या कोंबडीचे वजन वाढत जाते. त्यानंतर विक्रीवर परिणाम होतोच पण प्रत्येक दिवसाचा खाद्याचा खर्चही वाढतो. या भीतीपोटी मार्चनंतर काही व्यावसायिक वगळता अनेकांनी कोंबडी पिल्ले घेऊन पुढील बॅचचे उत्पादन घेणे टाळले. कोरोनाचा प्रादुर्भाव असाच राहिल्यास तयार झालेल्या कोंबडय़ांना मार्केट न मिळाल्यास आणखी तोटा सहन करावा लागण्याच्या शक्यतेने अनेकांनी उत्पादनापासून लांब राहण्याचा निर्णय घेतला.

या साऱयाचा परिणाम आता अडीच ते तीन महिन्यानंतर प्रकर्षाने जाणवू लागला आहे. याबाबत येथील चिकन सेंटरचे मालक विलास राणे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, सध्या वाढलेला दर कोंबडीच्या नियमितच्या मागणीपेक्षा जादा मागणी असल्याने वाढलेला नाही. तर मार्केटमध्ये कोंबडी शॉर्टेज झाल्याने दर वाढला आहे. कोरोनाच्या भीतीमुळे अनेकांनी उत्पादन न घेतल्याने मार्केटमध्ये माल कमी उपलब्ध झाला व त्याचा परिणाम दरावर झाल्याचे दिसते. मात्र, दर वाढलेला असला तरीही अजूनही ब्रॉयलर व बाजारात मिळणाऱया गावठी कोंबडीच्या सेलमध्ये तशी वाढ झालेली नाही. गावठी कोंबडीचा दर कोरोनाच्या प्रादुर्भावापूर्वी जो 240 रुपये होता, तोच आजही कायम आहे. मात्र, ब्रॉयलरच्या दरात वाढ झाली आहे.

अन्य काही चिकन व्यावसायिकांशी संपर्क साधला असता, सध्या झालेली वाढ ही कायमस्वरुपी राहण्याची शक्यता नसल्याचे सांगण्यात आले. कोरोनाची भीती कमी झाल्यानंतर कोंबडी उत्पादनात वाढ झाल्यावर ही वाढ आपोआपच कमी होईल, असे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here