30 C
Panjim
Wednesday, January 19, 2022

सिंधुदुर्गात शिमगोत्सवासाठी नियमावली जाहीर

Latest Hub Encounter

 

सिंधुदुर्गनगरी – शासनाने कोरोना विषाणूचा (कोव्हिड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्यात साथ रोग प्रतिबंधक कायदा, 1897, दिनांक 13/03/2020 पासुन लागु करुन खंड 2,3,4 मधील तरतूदींनूसार अधिसूचना निर्गमीत केलेली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये नियंत्रणात ठेवण्याच्या हेतूने व सार्वजनिक हिताच्या दृष्टीने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व प्रसार रोखणे आणि त्यासाठी ठोस उपाययोजना हाती घेणे आवश्यक झाले आहे.
ज्याअर्थी, कोविड 19 च्या अनुषंगाने यावर्षी सर्व धर्मिय सण, उत्सव तसेच सर्व कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरे करण्यात येत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कमी झालेला नसून सध्या जिल्ह्यात रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होताना दिसत आहे. तसेच शिमगोत्सवाकरिता मुंबई, पुण्यावरुन नागरीक येण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करता यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिमगा उत्सव, होळी उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने पुढील प्रमाणे मार्गदर्शक सूचना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिल्या आहेत.
त्यानुसार सर्व मंदिर विश्वस्त व पालखीधारक यांनी लगतच्या आरोग्य यंत्रणेकडून आरटीपीसीआर, रॅपिड अँटिजेन चाचणी करुन घ्यावी . सर्व मंदिर विश्वस्त व्यवस्थापक पदाधिकारी यांनी मोजक्या लोकांच्या उपस्थितीतच धार्मिक कार्यक्रम पार पाडणे बंधनकारक राहील. सर्व मंदिर विश्वस्त व्यवस्थापक, पदाधिकारी यांनी कमीत कमी ग्रामस्थ व मानकऱ्यांच्या उपस्थितीत पालखी परंपरेनुसार भेटीसाठी जाईल याची दक्षता घ्यावी. पालखी शक्यतो वाहनातून नेल्यास योग्य राहील. वाहनातून नेण्यास शक्य नसल्यास अशा वेळी पालखी धारकांनी स्वतः वाहून नेणेस परवानगी राहील. कोणत्याही परिस्थितीत 50 लोकांपेक्षा जास्त लोक जमा होणार नाहीत याची दक्षता मंदिर विश्वस्त, व्यवस्थापक, ग्रामस्थ, मानकरी, ग्राम नियंत्रण समिती यांनी घ्यावी. याकरिता पालखी दर्शनाच्या वेळा निर्धारीत करुन देण्यात याव्यात. होळी व पालखीची पूजा, नवस, पेढे, हार, नारळ इत्यादी स्वरुपात स्वीकारु नयेत तसेच प्रसाद वाटपही करु नये. सहाणेवर पालखी व होळीचे दर्शनासाठी प्रत्येक वाडीतील, भागातील लोकांना स्वतंत्र दिवस नेमून दयावा किंवा सदर कालावधीत 3 – 3 तास नेमून देणे, जेणेकरुन एकाच वेळी गर्दी होणार नाही. तथापि, अशावेळी उपस्थितांनी योग्य ते सामाजिक अंतर ठेवणे बंधनकारक राहील. उपस्थित सर्वांनी मास्क परीधान करणे बंधनकारक राहील. तसेच याचे उल्लंघन केलेस स्थानिक प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई केली जाईल. उपस्थित सर्वाचे थर्मल स्क्रिनिंग करणे बंधनकारक राहील. उपस्थित सर्वांनी हॅण्ड सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक राहील. सार्वजनिक सुविधांचे आणि मानवी संपर्कात येणारी सर्व ठिकाणी जसे की, दरवाजाचे हँडल आदींचे वारंवार निर्जतुकीकरण करणे बंधनकारक राहील. श्वसनसंबंधित शिष्टाचाराचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक असेल. यामध्ये शिंकताना किवा खोकताना टिश्यू पेपर किवा हातरुमाल किंवा हाताच्या कोपराने नाक व तोंड पूर्णपणे झाकले जाईल याची दक्षता घेणे तसेच वापरलेल्या टिश्यू पेपरची योग्य पध्दतीने विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. उक्त परिसरात थुंकण्यास पूर्णपणे प्रतिबंध असेल, तसेच याचे उल्लंघन केलेस स्थानिक प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई केली जाईल. पालखी घरोघरी नेण्यात येवू नये. होळी हा पारंपारिक सण आहे, मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर छोटया होळया आणून मोजक्या लोकांच्या उपस्थितीत परंपरेनुसार होम करणे. शबय मागणे, गावात खेळे, नमन इत्यादी लोककलेचे कार्यक्रम टाळावेत. धुलीवंदन व रंगपंचमीच्या दिवशी रंग उधळण्याचे टाळावे. मुंबईतील ग्रामस्थांना शक्यतो गावी न येण्याचे आवाहन करावे. तसेच होळीच्या कार्यक्रमाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, फेसबुक व वेबसाईट इत्यादी माध्यमांव्दारे उपलब्ध करुन दयावी. जेणेकरुन गावी न येणाऱ्या चाकरमानी यांना होळीचा कार्यक्रम पहाणे शक्य होईल. मुंबई, पुणे किंवा अन्य भागातून प्रतिबंधित क्षेत्रामधून जिल्हयात होळीच्या सणाकरिता येणाऱ्या नागरीकांकडे 72 तासांपूर्वी केलेल्या आरटीपीसीआर चाचणीचे निगेटिव्ह अहवाल असणे आवश्यक आहे. प्रतिबंधित क्षेत्रा बाहेरील लोकांना SPO2 टेस्टींग व थर्मल स्क्रिनिंग करणे बंधनकारक राहील . त्याकरिता ग्राम नियंत्रण समिती यांनी शाळा अथवा अन्य सार्वजनिक ठिकाणी स्क्रिनिंग सेंटर उभारावेत. या स्क्रिनिंग सेंटर बाबत फ्लेक्स व्दारे जनजागृती करावी. स्क्रिनिंग सेंटरवर नागरीकांमध्ये सर्दी, खोकल्या सारखी लक्षणे आढळल्यास त्यांना जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये पाठवावे. त्याचप्रमाणे सर्दी, खोकला व इतर कोव्हिड सदृश्य लक्षणे असलेल्या कोणत्याही नागरीकास शिमगोत्सवात सामील होता येणार नाही , असा कोणीही नागरीक शिमगोत्सवात सामील होणार नाही याची ग्राम नियंत्रण समितीने घ्यावी. ग्राम नियंत्रण समिती यांनी 50 पेक्षा जास्त लोकांची गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. सदर आदेशाचे उल्लंघन झाल्यास आणि कोरोनाचा शिरकाव मोठया प्रमाणात दिसून आल्यास ते पूर्ण क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येईल. तसेच याव्यतिरिक्त प्रशासनाने विहीत केलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील. तसेच प्रत्यक्ष सण सुरू होण्याच्या मधल्या कालावधीत काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचंदेखील अनुपालन करावे, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -