सिंधुदुर्ग – जिल्ह्याच्या कोरोना बाधितांच्या संख्येने द्विशतक पार केले आहे. जिल्ह्यात सध्या बाधित रुग्णांची संख्या 213 झाली आहे. कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींची संख्या 151 झाली आहे. तर सध्या 57 रुग्ण सक्रिय आहेत. रुग्ण संख्या वाढत असल्याने जिल्ह्यात चिंतेचं वातावरण आहे.
जिल्ह्यात रविवारी सकाळी मिळालेल्या रुग्णांत कणकवली तालुक्यातील जानवली 2, आशिये 2 आणि ओझरम एक अशा पाच रुग्णांचा समावेश आहे. तर कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथील चार रुग्णांचा समावेश आहे. नव्याने जिल्ह्यातील 88 व्यक्तींचे नमुने कोरोना तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. त्यामुळे नमुन्यांची संख्या 3 हजार 636 झाली आहे. तर 140 अहवाल नव्याने प्राप्त झाल्याने प्राप्त अहवालांची संख्या 3 हजार 599 झाली आहे. नव्याने 14 रुग्ण वाढल्याने बाधित झालेल्या रुग्णांची संख्या 213 झाली आहे. यातील चार व्यक्तींचे निधन झाले आहे. एक मुंबई येथे उपचाराला गेले आहेत तर 151 कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. परिणामी जिल्ह्यात 57 रुग्ण सक्रिय राहिले आहेत. तर अजून 39 अहवाल प्रलंबित आहेत. नव्याने 86 अहवाल निगेटिव्ह आल्याने जिल्ह्यातील निगेटिव्ह अहवालांची संख्या 3 हजार 386 झाली आहे. सध्या आयसोलेशन कक्षात 52 व्यक्ती उपचार घेत आहेत.
डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल असलेल्या जिल्हा रुग्णालयात सध्या 38 कोरोनाबाधित आणि 28 कोरोना संशयित उपचार घेत आहेत. डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये बाधित 9 आणि कोविड केअर सेंटरमध्ये बाधित 5 उपचार घेत आहेत. रविवारी आरोग्य पथकांकडून जिल्ह्यातील 4 हजार 829 व्यक्तींची नव्याने आरोग्य तपासणी करण्यात आली. जिल्ह्यातील संस्थात्मक क्वारंटाईनमधील 939 व्यक्तींचा कालावधी संपल्याने येथे 17 हजार 938 व्यक्ती दाखल आहेत. शासकीय संस्थेत क्वारंटाईन असलेल्या 2 व्यक्ती घरी गेल्याने येथे 59 व्यक्ती दाखल आहेत. तर गाव पातळीवरील क्वारंटाइनमधील 937 व्यक्ती घरी परतल्याने येथे 15 हजार 661 व्यक्ती दाखल आहेत. मात्र, नागरी क्षेत्रातील क्वारंटाइन वाढ झालेली नसल्याने 2 हजार 218 एवढीच संख्या राहिली आहे.