वैभववाडी – समाजातील शेवटच्या घटकावर अन्याय होणार नाही याची खबरदारी नेहमी पोलीस यंत्रणेने घेतली पाहिजे. गुन्ह्यांचा छडा लावणे हे पोलिसांचे कामच आहे. त्याचबरोबर अपघातातील जखमीला जीवदान देणे ही देखील पोलिसांची सामाजिक बांधिलकी आहे. वैभववाडीतील जनता सुजान आहे. त्यांचे प्रेम, आशीर्वाद पोलीस बांधवांच्या पाठीशी सदैव आहेत. चांगल्या कामगिरीनंतर जनतेकडून होणारे कौतुक हे पोलिसांसाठी टॉनिक आहे. असे प्रतिपादन वैभववाडीचे पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी केले.
वैभववाडी पोलिसांनी 23 लाख लुटीच्या गुन्ह्याचा 24 तासात छडा लावला. या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. युथ वेल्फेअर असोसिएशन सिंधुदुर्ग यांच्या मार्फत पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर जिल्हा बँक संचालक गुलाबराव चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देसाई, वैभववाडी राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष दादामिया पाटणकर, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष रवींद्र चव्हाण, तालुका बौध्द सेवा संघटनेचे सरचिटणीस रवींद्र पवार, असोसिएशनचे सचिव रुपेश घाडी, सहसचिव श्री. काझी, मनीष सागवेकर, संघटक पंडित परब, अनिकेत घाडीगावकर, संकेत घाडीगावकर, विराज तावडे, अविनाश लाड, सुजित तांबे, विवेक ताम्हणकर, केंद्रप्रमुख गौतम तांबे, पो.ना. मारुती साखरे, गणेश भोवड, आदी उपस्थित होते.
गुलाबराव चव्हाण म्हणाले, पो. अधिकारी अतुल जाधव यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे तालुक्यात काम केले आहे. शिवाय त्यांनी तालुक्यात माणुसकी जपली आहे. आमदार नितेश राणे यांनी देखील श्री. जाधव यांचा सत्कार केला. युथ वेल्फेअर ने श्री. जाधव यांच्या कामगिरी बद्दल सत्कार केला आहे. या असोसिएशनचे कार्य खूप मोठे आहे. या असोसिएशनच्या पाठीशी आम्ही सदैव आहोत असे सांगितले. पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देसाई, रवींद्र पवार यांनी मनोगत व्यक्त केले. कर्तव्यदक्ष अधिकारी अतुल जाधव यांचा वृक्ष देऊन वेल्फेअर असोसिएशन च्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार विवेक ताम्हणकर यांनी मानले.