रत्नागिरीत दापोली मध्ये होम क्वारंटाईन व्यक्तीचा मृत्यू रुग्णाला रुग्णालयात घेऊन येणारे १० जणही क्वारंटाईन

0
164

 

रत्नागिरीत दापोली तालुक्यातील एका 55 वर्षीय होम क्वारंटाईन असलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. बुरोंडी तेलेश्वर नगर परिसरातील ही व्यक्ती आहे. क्वारंटाईनमध्ये असलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याने दापोली प्रशासनाची मात्र, रात्रभर धावपळ उडाली आहे. खबरदारी म्हणून दापोली प्रशासनाने या मृत व्यक्तीचे स्वॅब नमुने तपासणी पाठवले आहेत. तसेच या व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन येणाऱ्या दहा जणांनाही क्वारंटाईन करण्यात आलं आहे. दरम्यान दापोलीच्या उपजिल्हा रुग्णलयात दाखल करण्यापूर्वीच या व्यक्तीचा मृत्यू झाल्याने मृत्यू कशाने झाला हे नेमके कळू शकलेले नाही. मिरज येथून अहवाल आल्यानंतरच मृत्यू कशामुळे झाला हे समजू शकणार आहे.

दापोलीतील ही व्यक्ती 22 मार्च रोजी घाटकोपर (मुंबई) येथून बुरोंडी येथे आपल्या घरी आली होती. मुंबई येथून आल्याने आरोग्य विभागाने त्यांना होम क्वारंटाईनचा सल्ला दिला होता. मुंबई येथून ते एकटेच आले होते, त्यांची पत्नी व दोन मुले घाटकोपर येथेच होती. काल गुरुवारी रात्री 11 च्या सुमारास शौचास जाऊन आल्यावर ते घराच्या अंगणात आले, तेव्हा त्यांच्या छातीत दुखू लागले. त्यांना उलटी झाली व तोंडातून फेसही येऊ लागला. तेव्हा ते ओरडू लागल्यावर शेजारची मंडळी धावत आली आणि एका वाहनाने त्यांना दापोली येथील एका खाजगी रुग्णालयात आणण्यात आले. तेथे तपासून त्यांना उपजिल्हा रुग्णालयात नेण्यास सांगण्यात आले. उपजिल्हा रुग्णालयात नेल्यावर तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून ते मृत झाल्याचे सांगितले.

या व्यक्तीच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का असल्याने लगेचच आरोग्य यंत्रणा सतर्क झाली. या व्यक्तीच्या मृत्यूमुळे गुरुवारी रात्रभर शासकीय यंत्रणेची चांगलीच धावपळ उडाली. या मृत व्यक्तीच्या स्वॅबचा नमुना घेण्यात आला असून तो तपासणीसाठी मिरज येथे पाठविण्यात आला आहे. दरम्यान या व्यक्तीला घेऊन आलेल्या 10 गावकऱ्यांना खबरदारीचा उपाय म्हणून कृषी विद्यापीठाच्या शेतकरी निवास येथील क्वारंटाईन कक्षात दाखल करण्यात आले आहे. या व्यक्तीच्या मृत्यूचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here