रत्नागिरीत कोरोनाबाधित महिलेकडून कर्मचाऱ्यांना धमकी

0
119

 

कोरोनाग्रस्त महिलेच्या जावेलाही कोरोना झाल्याची पुष्टी करणारा अहवाल प्राप्त झाल्यानंतर नवी रूग्ण व नातेवाईकांनी अहवाल खोटा असल्याचे सांगत गुरूवारी रात्री वॉर्डातच गोंधळ घातला. रुग्णालय कर्मचाऱ्यांना तिने आत्महत्येची धमकी दिली. तर दुसरीकडे रूग्णाच्या मुलानेही आत्महत्येची धमकी देत टय़ुबलाईटची नळी घेऊन कर्मचाऱ्यांवर धावून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिस व वैद्यकीय अधिकाऱ्यांचे हस्तक्षेपामुळे पहाटेच्या सुमारास वातावरण काहीसे निवळले. मात्र कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.

रत्नागिरी तालुक्यातील साखरतर येथील रोगगस्त कोरोनाग्रस्त महिलेच्या कुटुंबीयांना आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वाचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल गुरूवारी रात्री अकराच्या सुमारास प्राप्त झाला. यामध्ये संबधीत महिला रूग्णाची जाऊ पॉझीटीव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या अहवालानंतर आयसोलेशन कक्षात असलेल्या या महिलेला कोरोनाग्रस्त कक्षात हलवण्याची कार्यवाही सुरु झाली. मात्र आपल्याला काहीही झालेले नाही, हा अहवाल खोटा आहे, कोरोना विभागात आपल्याला हलवू नका, असे सांगत या महिला रूग्णाने  शिरा कापून आत्महत्येची धमकी दिली, असा आरोप तेथे कार्यरत असलेल्या अरुण डांगे या परिचारक कर्मचाऱयाने केला.

नव्या महिला रूग्णाबरोबरच तिच्या नातेवाईकांनीही अहवाल खोटा असल्याचे सांगत गलका केला. रुग्णाच्या मुलानेही बिल्डींगवरून उडी मारून जीव देण्याची धमकी दिली. यानंतर पोलिसांना बोलावण्यात आले. पोलिसांना घेऊन कर्मचारी आत गेले असता रुग्णाचा मुलगा भिंतीवरील टय़ूब काढून कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून आल्याचा आरोप रुग्णालय कर्मचाऱ्यांनी केला आहे.

जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर अश्फाक काझी यांनी, रुग्ण व नातेवाईकांची समजूत काढल्यावर ते काही काळ शांत झाले. मात्र त्यानंतर देखील रुग्णाचा मुलगा हातात दगड घेऊन रुग्णालयात फिरत होता. यानंतर खुद्द रूग्णानेच कर्मचाऱ्याला धमकावले व माझी माणसे बोलावली तर तुम्हाला कुठे गायब करतील समजणार देखील नाही अशी धमकी दिली. रात्री साडेअकरा पासून अडीच वाजेपर्यंत हा प्रकार चालू होता. या संपूर्ण घटनेचे कथन जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱयांनी आपल्या वरिष्ठांकडे केले आहे. या घटनेमुळे जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी वर्ग भीतीच्या छायेखाली असून आमच्या सुरक्षेचे काय ? असा प्रश्न उपस्थित करू लागला आहे.

याबाबतची माहिती मिळताच आमदार राजन साळवी व उद्योजक किरण सामंत यांनी तातडीने रूग्णालयात गाठले. यावेळी सुमारे 200 कर्मचारी रूग्णालयाच्या आवारात एकत्र जमले होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ .प्रवीण मुंढे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी देखील धाव घेतली. यावेळी कर्मचाऱ्यांनी आपल्या व्यथा मांडताना जिल्हा शल्यचिकित्सकांच्या कारभाराबाबतही तक्रारी केल्या. यावेळी राजन साळवी व किरण सामंत यांनी मध्यस्थी करत हे प्रकरण जिल्हाधिकाऱयांच्या उपस्थित सामोपचाराने मार्गी लावले. शल्य चिकीत्सकांविषयी गंभीर तक्रारी कर्मचाऱ्यांनी केल्या. त्यावर जिल्हाधिकाऱयांनी योग्य शब्दात संबंधितांना समज दिल्याचे समजते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here